Breaking News
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सर्वपक्षिय नेत्यांचा अर्ज भरण्याचा दमदार सोहळा नवी मुंबईत पाहायला मिळाला. कुठे पारंपरिक ढोल-ताशे, लेझिमच्या ठेक्यावर तर कुठे शक्तीप्रदर्शन करत मिरवणुक रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 150 ऐरोली आणि 151 बेलापुर या दोन्ही मतदार संघातून प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक, शिवसेना उबाठा गट मनोहर मढवी, मनसेचे निलेश बानखेले तर अपक्ष म्हणून विजय चौगुले यांनी वाजत गाजत मिरवणुक काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. तर बेलापुरमधून भाजपच्या आ. मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून संदीप नाईक, मनसेचे गजानन काळे तर अपक्ष म्हणून विजय नाहटा यांनी दमदार मिरवणुक रॅली काढून अर्ज भरुन आपली उमेदवारी पक्की केली. तसेच शेवटच्या दिवशी धनत्रयोदशीचा मुर्हुत साधुन बंडखोरी करुन विजय चौगुले, अशोक गावडे व मंगेश आमले यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला. एकुणच सर्वपक्षियांनी जनतेच्या प्रचंड उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
28 ऑक्टोबर रोजी आ. गणेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऐरोली, सेक्टर-4 मधील स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदान येथून मिरवणूक रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (आठवले) आणि मित्र पक्षांच कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी गणेश नाईक यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतले. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. नवी मुंबईला विकसित आणि सुरक्षित ठेवणारे नेतृत्व आमदार पदी कायम राहावे, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केल्या. जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादातही रॅली सरस्वती विद्यालय येथे पोहोचली. या ठिकाणी लोकनेते गणेश नाईक यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्याचदिवशी दुपारी 12 वाजता संदीप नाईक यांनी बेलापुर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज अश्विनी पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 1 दिवस आधी मनसेचे गजानन काळे यांनी भव्य रॅली काढून सफाई कामगार भगिनी व रिक्षाचालक भगिनी यांच्यासमवेत उमेदवारी अर्ज भरला. तर ऐरोलीतून एम.के.मढवी यांनीही मिरवणुक काढून आपला उबाठा गटाकडून अर्ज सादर केला. तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 151 बेलापूर मतदारसंघातून महायुतीच्या तर्फे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच शेवटच्या दिवशी विजय चौगुले, अशोक गावडे व मंगेश आमले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला. एकंदरीत मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
1990 पासून जनतेच्या विश्वासावर आपण आमदार म्हणून जिंकून येत आहे. या निवडणुकीतही जनतेच्या आशीर्वाद आणि पाठबळ मिळेल असा विश्वास आहे. नवी मुंबईच्या विकासाला गती देऊन तो पुढे न्यायचा आहे, असा निर्धार व्यक्त करून महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक दिलाने महायुतीच्या विजयासाठी काम करीत आहेत. - आमदार गणेश नाईक
नवी मुंबईचा सन्मान, नवी मुंबईचा संतुलित नागरिकांना हवा असलेला विकास, तरुणांना रोजगार, महिलांचे संरक्षण, के.जी.टू.पी.जी. पर्यंत महिलांचे शिक्षण, पर्यावरणाचे संतुलन, शहरातील सर्व धर्मीय लोकांना घेऊन एकत्र विकास करणे हाच आमचा विकासाचा अजेंडा आहे. विकासाचे मुद्दे आणि पक्षातील तसेच मित्रपक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची साथ यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात बदल निश्चित होणार याचा मला विश्वास आहे. - संदीप नाईक
नवी मुंबईकरांना खोटी आश्वासने देणार नाही. तर 500 रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून दिले की, शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध आहेफसवणुक केल्यास माझ्यावर 420 टचा गुन्हा दाखल करा. नवी मुंबईकांचे प्रश्न सोडवायला मी कटिबद्ध आहे. - गजानन काळे.
महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज अर्ज भरला असून त्यानिमित्ताने मला बळ देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सोबत केली त्या सर्व नेत्यांचे,पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे व सामान्य जनतेचे मनापासून आभार. - एम.के.मढवी
नवी मुंबईत मी केलेल्या विकासाच्या जोरावर मी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे गेली 15 वर्ष नवी मुंबईची सेवा करण्याची संधी मला नवी मुंबईकरांनी दिली व त्याचीच पोहोचपावती म्हणून प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी व महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी एकमेव महिला आमदार म्हणून मी अर्ज दाखल केला आहे. तुमची सेविका पुन्हा एकदा येत आहे आपली सेवा करण्यासाठी. बेलापूर मतदारसंघात केलेले उल्लेखनीय कार्याचे नवी मुंबईकर अनुभव घेत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत एकनिष्ठेने काम करण्याची व बेलापूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कमळ फुलविण्याची प्रतिज्ञा देखील केली आहे. - आ. मंदा म्हात्रे
मला निवडणुकीची तयारी करा असा आदेश आला. मात्र अचानक संदीप नाईक यांनी प्रवेश करताच मला बाजूला सारले. असा अन्याय यापुढे कार्यकर्ते आणि मतदार सहन करणार नाहीत. नवी मुंबईचा नविनत्तम पद्धतीने विकास व्हावा, रोजगार निर्मिती करण्यासाठी, पर्यटनाला वाव मिळावा यासारखे अनेक भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी अर्ज भरला आहे. राजकीय भुमितेतून समाजसेवा करायची आहे. - मंगेश आमले,
गेली 20 वर्ष नवी मुंबईतील जनतेची महापालिकेच्या व 10 वर्र्ष कृष्ी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या माध्यमातून सेवा केली. विकासाची व निरंतर विश्वासाची परंपरा या ध्येयाने ही निवडणुक विकासाच्या मुद्यांवर आम्ही लढवत आहोत. बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या हितासाठी अविश्वासाने काम करीत राहीन. - अशोक गावडे
नवी मुंबईत असलेल्या सर्व घटकांचा विचार करुन निर्णय घ्यायचा होता. पक्षाच्या चौकटीत न अडकता नवी मुंबईच्या विकासासाठी काम करायचे आहे. सगळ्यांचा आणि शिवसैनिकांचा आग्रह होता. एकही शिवसैनिक माझ्या विरोधात काम करणार नाही. आम्ही केलेले काम यावेळी उपयोगी पडेल. बेलापुर मतदार संघाची सांगली झाल्याशिवाय राहणार नाही. - विजय नाहटा
बंडखोरी केलेली नाही. पक्ष वाढीसाठी हा फॉर्म भरला आहे. नवी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे अस्तित्व टिकण्यासाठी, पक्षाला बळकटी देण्यासाठी फॉर्म भरला आहे. - विजय चौगुले
जनतेची सेवा करण्यासाठी, शिक्षणाचा प्रश्न, विज समस्या, ऐरोलीतील इतर समस्या सोडवण्यासाठी काम करायचे आहे. एकनिष्ठ असल्याने मला ही उमेदवारी दिल्याने परत एकदा सेवा करण्याची संधी ऐरोलीकरांनी द्यावी ही ईच्छा. - निलेश बाणखेले, मनसे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai