बनावट नंबर प्लेट वाहनांवर कारवाई

कळंबोली : बनावट नंबर प्लेटचा वापर करणार्‍या वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील सर्व वाहतूक शाखांना दिले आहेत. 

पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एम.एच. 46 बीएफ-9377 या ट्रेलरची पासिंग करण्यात आली आहे. या वेळी या ट्रेलरचालकाला 1 फेब्रुवारी रोजी दंडाचे चलन वाशी वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे. त्यांचा दंड 2800 रुपये इतका आहे. त्या अगोदर परेल येथूनही 800 रुपये दंडाचे चलन मुंबई वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे. तत्पूर्वी 200 रुपये दंडाचा संदेश चेंबूर येथून आला आहे. त्याशिवाय सानपाडा, खारघर वाहतूक शाखेचे चलनसुद्धा त्यांना संदेशाद्वारे पाठवले आहे. वास्तविक पाहता, हा ट्रेलर या परिसरात गेलाच नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विशेष म्हणजे, या क्रमांकाची नंबर प्लेट लावून एक टेम्पोचालक व्यवसाय करीत असल्याचे ट्रेलरचा मालक गोरखनाथ आहेर यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी यासंदर्भात नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना लेखी तक्रार केली होती. यासंदर्भात वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.