बायोमॅट्रिक नोंदीनुसार मिळणार वेतन

पनवेल : सरकारी कार्यालयांतील कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाच्या वेळेनुसार यापुढे वेतन देण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. कामाच्या तासाच्या योग्य नोंदीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालये आणि महसूल विभागातील तहसील कचेर्‍यांमध्ये तातडीने बायोमॅट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

रायगड जिल्ह्यामधील उपविभागीय कार्यालयांमध्ये व महसूल कचेर्‍यांमध्ये मागील वर्षभरापासून बायोमॅट्रिक पद्धतीने कर्मचारी व अधिकार्‍यांनी त्यांची हजेरीची पद्धत सुरू केली आहे. याच पद्धतीमुळे कर्मचारी प्रत्यक्षात किती वाजता कार्यालयात ये-जा करतात याची अचूक नोंद जिल्हा सामान्य प्रशासनाकडे नोंदविली जाते. जिल्ह्यातील 32 ठिकाणे बायोमॅट्रिक यंत्र लावली असली तरी यातील अनेक ठिकाणी ही यंत्र बंद व नादुरुस्त होती. त्यामुळे अनेकदा कर्मचार्‍यांच्या कामाचे तास अचूकपणे नोंदले गेले नव्हते. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी आठवड्यातील पाच दिवस कामाचे जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बायोमॅट्रिक यंत्र तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी याबाबत लेखी आदेश प्रत्येक उपविभागीय कार्यालयाला तातडीचे जाहीर केले आहेत.

या आदेशानुसार मार्च 2020 पासून महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांची कामाची येण्याची व जाण्याची वेळ बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदविली जावी तसेच याच पद्धतीने बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे. यानुसार कर्मचार्‍यांना वेतन देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी बैनाडे यांच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.