‘खेलो इंडिया युथ गेम’ मध्ये स्वस्तिका चमकली

पनवेल ः राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारी आणि ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेल्या टेबल टेनिस पटू स्वस्तिका घोष हिने आसाम येथे झालेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम 2020’ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. 

केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार दरवर्षी विविध क्रीडा प्रकार असलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने आसाममध्ये हि स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील कनिष्ठ एकेरी स्पर्धेत रजत तर दुहेरी गटात कांस्य पदक पटकाविले तसेच महाराष्ट्राच्या संघाने टेबल टेनिसमध्ये एकूण 9 पदके जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले त्यामध्ये स्वस्तिकाचे योगदान महत्वपूर्ण ठरले. टेबल टेनिस पटू स्वस्तिका घोष हिने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने दर्जेदार कामगिरी आंतरराष्ट्रीय मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची ती इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी असून माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. हाँगकाँग, जॉर्डन, कोलंबो, यांसह इतर देशामध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. त्यामुळे तीला ‘विराट कोहली फाऊंडेशन’ कडून स्कॉलरशिपही जाहीर झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे. 

स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. ओमान येथे झालेल्या ‘ओमान ओपन’ स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पडली, त्यावेळी या स्पर्धेत तीने कांस्य पदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वास्तिकाने 2013 मध्ये गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर अंडर 12 टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया रँक 01 प्राप्त केली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी त्यांनी आपल्या खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे. मागिल वर्षी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने सुवर्णयश कामगिरी केली होती.