नोकरीच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

नवी मुंबई ः वाशीतील फोर्टीस रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने कोपरखैरणेत राहणार्‍या डॉक्टर तरुणीची एक लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेत फसवणूक झालेली 26 वर्षीय तरुणी कोपरखैरणे येथे राहण्यास असून तिने 2017 मध्ये बीएचएमएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर ती चांगल्या रुग्णालयातील नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तिने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर बायोडाटा भरला होता. त्यानुसार मे 2019 मध्ये श्वेता सिंग नावाच्या महिलेने या डॉक्टर तरुणीला मोबाइलवर संपर्क साधून तिची वाशी येथील फोर्टीस रुग्णालयात मेडिकल अ‍ॅडमिनीस्ट्रेटर म्हणून नोकरीसाठी निवड करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच डाइस या रिक्रुटर कंपनीसोबत प्रोफाइल रजिस्ट्रर करण्यासाठी 1500 रुपये पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार डॉक्टर तरुणीने ही रक्कम ऑनलाइन पाठवून दिली होती. त्यानंतर महेक गुफ्ता नामक महिलेने या तरुणीला संपर्क साधून फोर्टिस रुग्णालयातील नोकरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे कारण सांगून तसेच ट्रेनिंग, इन्शुरन्स व बाँड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व सॅलरी अकाऊंट अशी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल एक लाख 17 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतरदेखील या टोळीकडून वेगवेगळी कारणे सांगून आणखी 62 हजारांची रक्कम पाठवण्यास सांगण्यात येऊ लागले. त्यामुळे डॉक्टर तरुणीला संशय येऊ लागल्याने तिने भरलेली सर्व रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे या टोळीने डॉक्टर तरुणीला तिचे पैसे कधी परत मिळतील याबाबतचा मेल फोर्टिस रुग्णालयाकडून येईल असे सांगून आपले मोबाइल फोन बंद करून टाकले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टर तरुणीच्या लक्षात आले व तिने सायबर सेलकडे लेखी तक्रार दाखल केली.