लसणाचे दर उतरले

नवी मुंबई : बाजारात नवीन लसणाची आवक वाढण्याने दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात हे दर किलोमागे 100 रुपयांनी उतरून आता 50 ते 100 रुपयांवर आले आहेत. दर घटल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

एपीएमसी बाजारात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत असतात. मात्र दोन वर्षांपूर्वी लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्पादनही कमी झाले होते. परिणामी लसणाचे दर गगनाला भिडले होते. दोन वर्षांपूर्वी 200 ते 250 रुपयांनी लसूण विकला जात होता. मात्र 2018 मध्ये लसणाचे मोठया प्रमाणात उत्पादन झाल्याने दर प्रतिकिलो 30 रुपये होते. मात्र, गतवर्षी व यंदा देखील लसणाचे दर तेजीत होते. घाऊक बाजारात मिळणारा प्रतिकिलो लसून 150ते 200 रुपयांनी उपलब्ध होता. मात्र, बाजारात आता आवक वाढली असल्याने या दरात 100 रुपयांनी घसरण झाली असून दर 50 ते 100 रुपयांवर आले आहेत. सध्या मध्य प्रदेश येथून नवीन लसणाच्या 20 गाडयांची आवक झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.