सिटी सर्वेक्षण पुन्हा होणार सुरु

आ. मंदा म्हात्रे यांची सिडको व्यवस्थापकांसोबत बैठक संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत, बेलापूर गावातील थांबविण्यात आलेले विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षण पूर्ण करून ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे याकरिता आमदार मंदा म्हात्रे यांची नुकतीच सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची नुकतीच सिडको भवन येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीत बेलापूर गाव विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण हे येत्या 8 दिवसांत सुरु करणार असल्याचे सिडको व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सूचित केले. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अनेक स्तरातून त्यांचे आभार व्यक्त होत आहे. यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत, सदर घरांचे प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळावे, याकरिता मी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. ठाणे जिल्हाधिकारी व सिडको कार्यालयाकडून शिदोरे अँण्ड शिदोरे कंपनी मार्फत बेलापूर गावातील विस्तारित गावठाण घरांचे सिटी सर्वेक्षण अर्धे अधिक पूर्णही झाले आहे. परंतु काही कारणास्तव सदर सिटी सर्वेक्षण थांबविण्यात आले होते. सदर सर्वेक्षण पुन्हा सुरु करून सर्वेक्षण झालेल्या ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी दिल्यास ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होण्यास मदत होणार आहे. सदरबाबत आज सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्रा यांजबरोबर बैठक संपन्न झाली आहे. येत्या 8 दिवसांत बेलापूर गावातील थांबविण्यात आलेले विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणास सुरुवात करणार असल्याचे लोकेश चंद्रा यांनी बैठकीत सूचित केले आहे. त्यामुळे सर्वेक्षण झालेल्या घरांना क्रमांकित करून त्यांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.