शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटी रुपये मंजूर करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले आहे. रयतेचे राज्य आलंय त्यामुळे यावेळी शिवनेरी किल्ल्यावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचंही अजित पवार यांनी म्हटले आहे.

सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ’जय भवानी, जय शिवाजी’, ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली आहे. या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमुन गेलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवनेरीवर दाखल झाले होते. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गाण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.