ऑनलाइन सेवांना उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई ः सिडको वसाहत विभागाच्या ऑनलाइन सेवांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत विविध सेवांसाठी सिडकोकडे 11,013 अर्ज प्राप्त झाले आहेत. सिडको वसाहत विभागाच्या सेवा 1 नोव्हेंबर, 2019 पासून पूर्णत: ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) करण्याच्या उद्देशाने सदर निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर सदर ऑनलाइन सेवांकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वसाहत विभागाशी संबंधि विविध सेवा जसे, ‘तारण ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करणे, कायदेशीर वारस हस्तांतरण, विविध प्रकारच्या परवानग्या प्राप्त करणे इ. सेवांचे सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने या सेवांशी संबंधित प्रक्रियांचा आढावा घेऊन सिडकोने ऑनलाइन शुल्क भरणा सुविधा, सादर कराव्या लागणार्‍या कागदपत्रांची संख्या कमी करणे, अर्जदारांना स्कॅन केलेली कागदपत्रे सादर करण्याची मुभा देणे, नागरिकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन देणे, डिजिटल स्वाक्षरी असलेल्या परवानग्या/ना-हरकत प्रमाणपत्रे ऑनलाइन पाठवणे इ. निर्णय घेतले आहेत. सर्व अर्ज आता ऑनलाइन स्वीकारण्यात येऊन संबंधित कागदपत्रेही स्कॅन करून सादर करण्याची सेवा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

वसाहत विभागाच्या या ऑनलाइन सेवांना नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळून आतापर्यंत विविध सेवांसाठी 11,013 अर्ज प्राप्त झाले असून त्यांपैकी 9,514 अर्जांवर ऑनलाइन माध्यमातून कार्यवाही करण्यात आली तर 1,499 अर्जांवर ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. तसेच वसाहत विभागाशी संबंधित परवानाग्या, ना-हरकत प्रमाणपत्रेही अर्जदारांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात येत आहेत. वसाहत विभागाच्या सेवा ऑनलाइन करण्यात आल्यामुळे अर्जदार नागरिकांच्या वेळेत बचत होण्यासह संबंधित सेवा त्यांना अधिक पारदर्शक, सुलभ व जलद पद्धतीने मिळत आहेत.