‘ट्रान्सफर मेड इझी’ पुस्तिका उपलब्ध

सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरणविषयक सेवेची माहिती मिळणार

नवी मुंबई ः सिडकोच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्‍या विविध सेवा या नोव्हेंबर, 2019 पासून पूर्णत: ऑनलाइन करण्यात आल्यापासून हस्तांतरणविषयक सेवेची माहिती देणारी ‘ट्रान्सफर मेड इझी’ ही पुस्तिकाही आता ऑनलाइन व कोणतेही शुल्क न आकारता अर्जदारांकरिता सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

नवी मुंबईतील नागरिकांना वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्‍या विविध सेवा जसे, वारस/मालमत्ता  हस्तांतरण, तारण ना-हरकत प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, इ. या अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक रीतीने मिळाव्यात व नागरिकांना त्यासाठी वारंवार सिडको कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने 1 नोव्हेंबर, 2019 पासून या सेवा पूर्णत: ऑनलाइन डिजिटल माध्यमातून देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. तसेच या सेवांशी संबंधित अर्ज करणे, शुल्क भरणे, कागदपत्रे सादर करणे, नागरिकांना प्रमाणपत्रे, परवानग्या, आदेश पाठवणे या प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवा सुरू केल्यानंतरही योग्य माहिती अभावी नागरिकांना अडचणी येऊ नयेत याकरिता हस्तातंरणविषयक सेवेची माहिती देणार्‍या या योजना पुस्तिकेची विक्री (रोख रु. 53/- या किंमतीस) सिडकोने चालू ठेवली होती. 

ऑनलाइन सेवांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने सिडकोने ‘ट्रान्सफर मेड इझी’ या पुस्तिकेची विक्री थांबविण्याचा निर्णय घेत ही पुस्तिका सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना छापील पुस्तिका विकत घेण्यासाठी सिडको कार्यालयात येण्याची व या पुस्तिकेसाठी कोणेतही शुल्क भरण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तसेच सदर संकेतस्थळावरून अर्ज व संलग्न प्रपत्रे डाऊनलोड करून नागरिक ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहेत. 

तरी यापुढे सदनिका/वाणिज्यिक गाळे/कार्यालये/भूखंड यांच्या हस्तांतरण प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी सदर पुस्तिका विकत घेण्याची आवश्यकता असणार नाही याची अर्जदार नागरिकांनी नोंद घ्यावी.