आग्रोळीत स्मशानभूमी होणार

नवी मुंबई ः देशाला स्वातंत्र्य मिळून 85 वर्षे होत आहेत. मात्र बेलापूरमधील आग्रोळी गावात अजूनपर्यंत स्मशानभूमी उभारण्यात आली नव्हती. मात्र आत्ता या गावासाठी पालिकेच्या वतीने स्मशानभूमी बांधून तयार झाली असून लवकरच ती वापरासाठी खुली होण्याची शक्यता आहे.

आग्रोळी गाव बेलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला पारसिक डोंगराच्या खाली वसलेले आहे. डाव्या विचारसरणीच्या अनेक राष्ट्रस्तरीय बैठका या गावात झाल्या आहेत. या गावात डाव्या पक्षांची एक भक्कम चळवळ त्या काळी उभी राहिली. मात्र इतके महत्त्व असलेल्या गावात अजूनही स्वतंत्रस्मशान भूमी नव्हती. त्यामुळे गावात इतके वर्ष अंत्यविधीसाठी फरफट सुरू होती. गावात कोणाचा मृत्यू झाला, तर अंत्यविधीसाठी बेलापूर रेल्वे रूळ ओलांडून बेलापूर गावात जावे लागत होते. अशा वेळी एखादी रेल्वे आली, तर ती जाऊन रूळ मोकळा होईपर्यंत लोकांना पार्थिव खांद्यावर घेऊन थांबावे लागत होते. यामुळे या ठिकाणी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. पालिकेच्या वतीने 2011मध्ये या ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता, ठेकेदार नेमून काम सुरू करायलाही सांगितले होते. मात्र गावातील स्थानिक गटांमधील राजकारणात स्मशानभूमीची उभारणी रखडली होती. मात्र मागच्या वर्षापासून या स्मशानभूमीच्या उभारणीला सुरुवात झाली आणि अखेर स्मशान भूमी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. स्मशानभूमीसाठी काँग्रेसचे नेते, स्थानिक ग्रामस्थ सुधीर पाटील यांनी दहा वर्षांपासून पालिकेकडे यासाठी पाठपुरावा केला होता.