नेरूळहून हवी सीएसएमटी लोकल

नवी मुंबई ः नेरूळ रेल्वे स्थानकातून सीएसएमटीसाठी सकाळच्या वेळी दोन विशेष लोकल चालवण्यात याव्यात, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नेरूळ रेल्वे स्थानकात निदर्शने करण्यात आली. येत्या महिन्याभरात आपल्या मागणीसंदर्भात विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने रेल्वेच्या प्रबंधकांची भेट घेऊन दिला. नवी मुंबईतील सर्वात मोठा नोड असलेल्या नेरूळची लोकसंख्या सुमारे चार लाख इतकी आहे. त्यामुळे नेरूळ रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्‍यांची संख्या इतर स्थानकांपेक्षा दुप्पट आहे. सकाळच्या वेळी नेरूळ स्थानकात लोकलमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा मिळत नाही. हे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचीही भीती आहे. त्यामुळे नेरूळहून सकाळी 8 ते 10 या वेळेत दोन विशेष सीएसएमटी लोकल सोडण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अफसर इमाम यांनी केली आहे.