सूसाट वाहनांना स्पीडगनची वेसण

मुंबई ः महामार्गावर सूसाट गाडी चालविणार्‍या वाहनचालकांना स्पीडगनने चांगलीच वेसण घातली आहे. नोव्हेंबरपासून ’इंटरसेप्टर’ नावाच्या अत्याधुनिक वाहनातून वेगवेगळ्या साधनांतून चुकार वाहनचालकांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत 96 इंटरसेप्टर वाहनांच्या सहाय्याने 16 हजार 705 वाहनचालकांवर सुमारे 17 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे.

नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालविल्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. महामार्गांवर सुसाट वेगाने जाणार्‍या वाहनांना रोखण्यासाठीच महामार्ग पोलिसांनी इंटरसेप्टर वाहनांचा समावेश केला आहे. महामार्ग पोलिसांच्या अखत्यारीत 63 आणि उर्वरित राज्यात संबंधित अधीक्षकांच्या अखत्यारीत 33 अशी इंटरसेप्टर वाहने आहेत. या वाहनांमध्ये स्पीडगन, काळ्या काचेचे प्रमाण तपासणे आदींचा समावेश आहे. त्यातील स्पीडगन ही वेगमर्यादा ओलांडणार्‍या चालकांना टिपण्यासाठी अंतर्भूत आहे. इंटरसेप्टर वाहन एखाद्या सुरक्षित अंतरावर उभे केले जाते. एखादे वाहन भरधाव वेगाने जात असल्यास त्याचा अचूक वेग मोजण्याचे काम स्पीडगनकडून केले जाते. साधारण 300 मीटर अंतरापर्यंत ही स्पीडगन वेगाचा मागोवा घेउ शकते. अद्ययावत प्रणालीमुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय गाडीचा वेग नोंदविला जातो. हा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तसे ई-चलान आपसूकच संबंधित वाहनचालकास पाठविले जाते. नोव्हेंबरमध्ये आलेल्या इंटरसेप्टर वाहनांमधून 16 फेब्रुवारी 2020पर्यंत अतिवेगाने जाणार्‍या 16 हजार 700 चालकांना चलान पाठविले असून ही दंडाची रक्कम 16 कोटी 75 लाखांवर जाते. तर हेल्मेट न वापरणार्‍या 4 हजार चालकांकडून 21 लाखांवर दंड आकारला आहे. महामार्ग पोलिसांकडून वर्षभर केलेल्या कारवाईतून 36 कोटी 21 लाख रु.चा दंड वसूल केला आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी इंटरसेप्टर वाहनांचा उपयोग होत आहे. सुरक्षितता आणि वेगाचा संबंध जवळचा असल्याने परिणामकारक उपाय योजले जात असल्याचे महामार्ग पोलिस अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.