उरण रेल्वेच्या दुसरा टप्पात भुसंपादनाचा तिढा

नवी मुंबई : नेरुळ ते खारकोपर रेल्वे गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु झाली. खारकोपर ते उरण या दुसर्‍या टप्प्यात तीन किमी क्षेत्रातील जागेच्या भुसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खारकोपर ते गव्हाण दरम्यान तीन किमी लांबीचे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित असल्याने या जागेच्या संपादनाचा प्रश्न रखडला आहे. परिणामी नेरूळ-उरण लोकलचा दुसरा टप्पा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेरूळ ते उरणपर्यंतच्या सुमारे 22 किमी अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभारंभ झाला. त्यापुढील साधारण पंधरा किमी अंतराच्या दुसर्‍या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा टप्पा मार्च 2021 मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार सिडको आणि मध्य रेल्वेने केला आहे. सध्या गव्हाण ते उरण दरम्यानच्या 11 किमी क्षेत्राच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या पट्ट्यात कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. असे असले तरी खारकोपर ते गव्हाण दरम्यानच्या तीन किमी क्षेत्रातील जागेच्या भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हे क्षेत्र वनविभागाच्या अखात्यारित आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटी आहे. दुसर्‍या टप्प्याच्या मार्गात हा महत्त्वाचा अडथळा असल्याने सिडकोसह मध्य रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. तर वनविभागाच्या ताब्यातील ही जागा संपादित करण्याच्या दृष्टीने सिडको प्रशासनाचा जोरदार पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात वनविभागाच्या संबंधित अधिकार्‍याबरोबर सिडकोची तीन महिन्यांपूर्वी नागपूर येथे बैठक झाली होती. मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समजते. खारकोपर ते गव्हाण दरम्यानचे तीन किमी क्षेत्र रेल्वे प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात वनविभागाने काही आक्षेप नोंदविल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका नेरूळ-उरण लोकलच्या दुसर्‍या टप्प्याची डेडलाइन हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यासाठी सिडकोने मार्च 2021चा मुहूर्त निर्धारित केला आहे. मात्र भूसंपादनाअभावी या प्रकल्पासाठी 2022 उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.