Breaking News
देशातील सर्वसामान्य गरीब मुस्लिमांची मने जिंकण्यासाठी भाजपने अलिकडेच घरोघरी जाऊन ईदच्या भेटवस्तूंचे वाटप केले. पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने दिल्लीतून हा देशव्यापी प्रचार केला. पक्षातर्फे 32 लाख मुस्लिम कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी किट’चे वाटप करण्यात आले. बिहार विधानसभा निवडणुकीपूव सुरू झालेल्या पक्षाच्या या प्रचाराचा अर्थ शोधला जात आहे. भाजपच्या मूळ मतदारांचा एक भाग ‘सोशल मीडिया’वर या मोहिमेवर टीका करत असला, तरी काही निवडक घटनांच्या निमित्ताने एका विशिष्ट वर्गाला फुटीरतेच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नांना ‘सबका साथ, सबका विकास’ या मोहिमेद्वारे रोखले जाऊ शकते, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय हित हा भाजप आणि मोदींचा सर्वात मोठा अजेंडा आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाद्वारे देशातील 32 हजार मशिदी-मदरसे या मोहिमेशी जोडले जाणार असल्याचे सांगितले गेले. गरीब आणि गरजू मुस्लिम कुटुंबांची यादी प्रत्येक मस्जिद किंवा मदरशाद्वारे तयार करुन ‘सौगात-ए-मोदी किट’चे वाटप केले गेले. यासाठी अल्पसंख्याक मोर्चाच्या 32 हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. किमान शंभर कुटुंबांना मोदींच्या भेटवस्तूंचे वाटप करण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्याने पेलली. जिल्हास्तरावरही ईद मिलन सोहळ्याचे आयोजन करण्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपने गेल्या 11 वर्षांच्या मोदी सरकारच्या राजवटीत तुष्टीकरण न करण्याच्या नावाखाली मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा कोणताही ठोस प्रयत्न केला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे ताजे भेटवाटप चर्चेचा विषय ठरले.
भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळात ‘सौगात-ए-मोदी’सारखा कार्यक्रम हा मुस्लिम मतदारांमध्ये प्रवेश करून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न मानला जात आहे. गेल्या काही काळापासून भाजपची मूळ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मुस्लिमांबाबत आपल्या वक्तव्यात नरमाई दाखवली आहे. भारताची भूमी स्वतःची मानतो तो हिंदू, अशी व्याख्या भाजपतर्फे अलिकडेच मांडण्यात आली. ‘सौगात-ए-मोदी’सारख्या योजनेला जोडून भाजपचा मुस्लिमांबाबतचा दृष्टिकोनही बदलताना दिसत आहे. अलीकडच्या काळात मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे मशिदींना भेट देऊन भाजप किंवा त्यांचे सरकार विशिष्ट धर्माच्या विरोधात नसून कट्टरतावादाच्या विरोधात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वष सप्टेंबरमध्ये त्यांनी ब्रुनेईच्या भेटीदरम्यान राजधानी बंदर सेरी बेगवान येथील ऐतिहासिक सुलतान उमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली होती. त्याआधी त्यांनी 2023 मध्ये इजिप्तमधील अल-हकीम मशिदीलाही भेट दिली होती. भागवत यांनी ‘इंडिया गेट’ जवळील कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या मशिदीलाही भेट देऊन दिल्लीतील सर्व इमामांची भेट घेतली होती. मोदी यांनी यापूव मतपेढीचे राजकारण करणाऱ्यांनी पसमंदा मुस्लिमांना उद्ध्वस्त केले गेले आहे, अशी टीका करत अतिशय गरीब असणाऱ्या या समाजाचे प्रश्न सोडवा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनावरून भाजपने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियान सुरू केले आहे.
दाऊदी बोहरा समाजातील मुस्लिमांनाही जोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदी फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईतील बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय मोदी यांनी नुकतेच उदारमतवादी आणि समतावादी समजल्या जाणाऱ्या सुफी पंथाच्या कार्यक्रमातही भाग घेतला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी संघासाठी कोणीही अनोळखी नाही, मुस्लिम आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, ते आमचेही आहेत, असे म्हटले. हा देश जितका आपला आहे, तितकाच त्यांचा आहे. सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे, उपासना पद्धतीच्या आधारे ते वेगळे करता येत नाहीत, हे त्यांचे उद्गार संघाच्या बदललेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. देशातील सुमारे शंभर लोकसभा मतदारसंघांमधील मुस्लिम मतदारांची उपस्थिती प्रभावी आहे. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि केरळमधील अनेक जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक ठरत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह 18 राज्यांमध्ये पसमांदा मुस्लिमांची लोकसंख्या मोठी आहे, तर देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी दहा टक्के दाऊदी बोहरा समाज आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘सौगात-ए-मोदी’ या योजनेकडे पहावे लागेल. भाजपला या रणनीतीद्वारे मुस्लिम समाजात शिरकाव करायचा असून विरोधी पक्षाचे आपल्यावरील आरोप चुकीचे आहेत, हे सिद्ध करायचे आहे. बिहार, पश्चिम बंगाल तसेच उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत या रणनीतीचा फायदा होऊ शकतो, असा विश्वास भाजपला आहे.
मुस्लिम समाजामध्ये भाजपबद्दल असलेला ऐतिहासिक अविश्वास आणि त्याची हिंदुत्ववादी प्रतिमा ही रणनीती कमकुवत करू शकते. रमजान आणि ईदच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेली ही योजना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप याला समरसता आणि विकासाचा संदेश म्हणत आहे, तर विरोधक निवडणुकीची रणनीती म्हणत आहेत. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. पुढच्या वष पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. या तीनही राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 18 टक्के असून पश्चिम बंगालमध्ये 31 टक्के आहे. त्यामुळे मुस्लिमांना आपलेसे करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचा दावा केला जात आहे. भाजप मात्र हा आक्षेप फेटाळून लावताना पंतप्रधान मोदींच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या सूत्रावर कारभार सुरू आहे; भाजपने ‘सौगात-ए-मोदी’ची सुरुवात दिल्लीतून केली असली, तरी त्याची सर्वाधिक चर्चा बिहारमध्ये होत आहे. कारण बिहारमध्ये याच वष विधानसभा निवडणुका होणार असून मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
बिहारच्या 18 टक्के मुस्लिम लोकसंख्येपैकी आठ टक्के मतदारांनी 2015 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘एनडीए’ला मतदान केले, तर राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाला 78 टक्के मुस्लिम मते मिळाली. 2019 पासून समीकरणे बदलली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची युती झाल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मुस्लिमांची सहा टक्के तर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या युतीला 77 टक्के मुस्लिम मते मिळाली. 2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘एनडीए’ला पाच टक्के तर काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल युतीला 76 टक्के मुस्लिम मते मिळाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘एनडीए’ला बारा टक्के मुस्लिम मते मिळाली होती, तर काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल युतीला 87 टक्के मुस्लिम मते मिळाली होती. आता ‘सौगात ए-मोदी’ या भेटीमुळे मुस्लिम मतदार भाजपकडे झुकणार का आणि मुस्लिमबहुल जागांवरही कमळ फुलणार का, हा प्रश्न आहे. गेल्या वष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिमांमधील मागासांना आपलेसे करण्यासाठी पसमंदा समाजाच्या समस्या जाणून त्यांचे प्रश्न सोडवण्यास सांगितले होते. उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नंतर होणारी विधानसभा निवडणूक तसेच बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभेची आगामी निवडणूक आणि तिथल्या मुस्लिमांची संख्या विचारात घेऊन ‘सौगात ए मोदी’ हा उपक्रम राबवण्यात सुरुवात झाली आहे. या मोहिमेद्वारे भाजप नेमके काय साधतो, हे आता पहायचे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai