अर्थसंकल्पात सबका साथ, सबका विकास

3850 कोटींचा महापालिकेचा अर्थसंकल्प; सलग 25 वर्षे कोणतीही करवाढ न करण्याचा विक्रम

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2020-21 चे 3850 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी स्थायी समितीत सादर केले. गेली 20 वर्षे करदात्यांना सत्ताधार्‍यांकडून मिळत असलेली भेट याही वर्षी कायम आहे. करवाढ न लादता हजारो कोटींची कामे सर्वच घटकांसाठी या अंदाजपत्रकात प्रस्तावित करून ‘सबका साथ, सबका विकासा’चा मार्ग सत्ताधार्‍यांनी अवलंबल्याने नवी मुंबईकरांनी समाधान व्यक्त केले आहे.  

नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2019-20 चे सुधारित आणि सन 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीपुढे सभापती नवीन गवते यांच्याकडे सादर केले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार सन 2019-20 चा सुधारित जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1905.69 कोटी व रु.4275 कोटी जमेचे आणि रु.3057.54 कोटी रुपये खर्चाचे तसेच सन 2020-21 साठी 1217.76 कोटी रु.आरंभीच्या शिलकेसह 3850 कोटी जमा व रु. 3848.91 कोटी खर्चाचे आणि रु.1.09 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे मूळ अंदाज स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात आले. यामध्ये उत्पन्नाच्या रकान्यात मालमत्ता करातून 630 कोटी रु., विकास शुल्कातून 125 कोटी रु., जाहिरात परवान्यातून 10 कोटी रु. तर शासनाकडून जीएसटीपोटी मिळणारे 1250 कोटी रुपयांचे अनुदान गृहित धरण्यात आले आहे. तर खर्चासाठी नागरी सुविधेसाठी 987 कोटी, प्रशासकीय सेवेसाठी 638 कोटी, पाणीपुरवठा व मलनिःसारण 580 कोटी, उद्यान व मालमत्तेसाठी 389 कोटी, ई-गर्व्हनरसाठी 22 कोटी, आरोग्य सेवेसाठी 166 कोटी, शिक्षण विभागासाठी 152 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन आणि क्षेपणभूमी व्यवस्थापनासाठी 429 कोटींची तरतूद करून एकूण 3848 कोटी रुपये या अंदाजपत्रकात नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहेत.  नवी मुंबई महानगरपालिकेने या वेळी समाजातील सर्वच घटकांना नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प बनवला असल्याचे दिसत आहे. यामध्ये फेरीवाल्यांसाठी जागा विकसित करणे, नागरिकांची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल बांधणे तसेच घणसोली-ऐरोली पामबीच रस्त्यावर पूल बांधून नवी मुंबईकरांना ठाणे-बेलापूरला स्वतंत्र समांतर मार्ग देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सायन्स पार्क, खेळांडूसाठी घणसोली येथे अद्ययावत क्रीडा संकुल, तरणतलाव व मैदाने विकसित करण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची ओळख कायम राहील म्हणून मूळ गावठाणांच्या ठिकाणी प्रवेशद्वारे, पर्यावरणपूरक सायकल ट्रॅक उभारणे, विद्युत खांब बदलणे, मध्यवर्ती ग्रंथालय बांधणे, वाहनतळ विकसित करणे, वृद्धाश्रम बांधणे, टर्शिरी ट्रिटमेंट प्लान बांधणे, यासारखी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. अपंग शिक्षण व प्रशिक्षणासाठीही मोठी तरतूद करण्यात आली असून पालिकेच्या ग्रथांलयांमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष प्रस्तावित करण्यात आला आहे. क्रीडा व सांस्कृतिक धोरणांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या खेळांडूसाठी अर्थसाहाय्य, शिष्यवृत्ती देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. महिला व बाल कल्याण विभागामार्फत आठ नवीन ग्रंथालये व अभ्यासिका तसेच रोजगारभिमुख 30 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे या अंदाजपत्रकात प्रस्तावित करून सर्व दुर्बल घटकांना लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य करण्याचे नमूद केले आहे. अग्निशमन विभागासाठी नवी मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने 68 मीटर व 60 मीटर उंचीचे वाहन खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात 1400 सीसीटीव्ही कॅमेरे प्रस्तावित करण्यात आले असून, शाळांमध्येही सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. 

पालिकेच्या या अर्थसंकल्पात फेरीवाले, पालिकेच्या शाळेत जाणारे  विद्यार्थी, नवी मुंबईतील दिव्यांग, खेळाडू, वाहनकोंडीची समस्या, प्रकल्पग्रस्तांची ओळख ते उत्तुंग इमारतीत राहणार्‍या सर्वच घटकांची नाळ या अर्थसंकल्पात जोडण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांसह पालिका आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे कोणतेही करवाढ न करता विकासाचा राजमार्ग कसा साधावा, याचे दर्शन या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. स्थायी समितीत याबाबत चर्चा होऊन नंतर तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येईल. 

अर्थसंकल्पावर नाईकांची छाप

गेली 25 वर्षे कोणतीही करवाढ न करता विकासाची कामे करता येतात हे माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनी आपल्या कृतीतून नवी मुंबईकरांना दाखवून दिले आहे. या अर्थसंकल्पात सर्वच घटकांना दिलासा देत ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आपले धोरण असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. पालिकेच्या  निवडणुकीच्या  तोंडावर सादर झालेल्या अर्थसंकल्पावर गणेश नाईकांची छाप पडल्याने विरोधकांवर कुरघोडी करण्याची संधी अर्थसंकल्पाद्वारे त्यांना मिळाली आहे.