वाशीत शेअर रिक्षा चालकांची दादागिरी

वाहतूक नियमांचे उल्लंघन : चौकात मधोमध रिक्षा थांबवून रस्ता अडविण्याच्या प्रकारांमध्ये वाढ

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढला असून प्रवासी मिळविण्यासाठी चाललेल्या धडपडीपोटी वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे. वाशी रेल्वे स्थानकासमोर तसेच शबरी हॉटेल समोरील चौकात दोन्ही बाजूस रस्ता अडविण्याचा प्रकार रिक्षाचालकांकडून होत असून इतर वाहनचालकांसह पादचार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारने परवाने खुले केल्यानंतर रिक्षा चालकांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.सरसकट परवाने देण्यात येत असल्याने नवी मुंबईतही रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. एकंदरित रिक्षांच्या वाढत्या प्रमाणामुळे चालकांची दिवसअखेर मिळणारी कमाई कमी झाली आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बेशिस्तपणा वाढण्यात झाला असून चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लघंन होत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे या मार्गावर प्रवाशांना शेअर रिक्षा व मीटरने असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. शेअर रिक्षाची पद्धत या मार्गावर मोठ्या प्रमाणात आहे. रिक्षाचालकांकडून प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, कुठेही रिक्षा उभी करणे, पादचार्‍यांनी आक्षेप घेतल्यास दमदाटी करणे, प्रवाशी मिळविण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगवर रिक्षा मध्येच उभी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. शबरी हॉटेल समोरील चौकात तर वाशी-कोपरखैरणे तसेच कोपरखैरणे-वाशी अशा दोन्ही बाजूस प्रवासी थेट आपल्या रिक्षात बसावा म्हणून चढाओढ असते. यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या केल्या जातात. या प्रकारामुळे इतर वाहनांना येथून मार्ग काढण्यासाठी जोरजोरात हॉर्न वाजवावा लागतो अन्यथा वादावादीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मुख्य रस्त्यावरही सायंकाळी एकामागोमाग रिक्षा रेटून वाहतुक कोंडी करतात. ऐनगर्दीच्या वेळी रिक्षाचालक रस्ता अडवत असल्याने प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शबरी हॉटेल समोरील चौकातही पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी रिक्षांमधून अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत अनेक वेळा वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. मात्र, बेशिस्त रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शेअर रिक्षांमधून चार ते पाच प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिस गांभीर्याने लक्ष देत नसून नियम मोडणार्‍या चालकांवर मेहरनजर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासर्व प्रकाराला लवकरात लवकर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


प्रवाशी मिळविण्यासाठी अनेक वेळा रिक्षा चालक रत्याच्या मधोमध वाहन उभे करत आहेत. त्यावरून वादावादी होत असून प्रसंग हमरीतुमरीवर येत आहेत. प्रवाशांबरोबर कसे बोलावे याचे प्रशिक्षण रिक्षाचालकांना देणे गरजेचे आहे.

- प्रकाश पाटील, रहिवाशी, वाशी, नवी मुंबई