लग्नात जमा झालेली रक्कम सशस्त्र सेना ध्वज निधी फंडामध्ये सुपुर्द

नवी मुंबई : माजी सैनिक आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठयावर असलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी कार्य करणार्‍या ठाण्यातील धिरज धारोड यांनी आपल्या मुलीच्या लग्न समारंभात येणारे पाहुणे, नातेवाईक व मित्रमंडळींना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न देण्याचे आवाहन करत सदर रक्कम माजी सैनिक कल्याण निधीसाठी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धारोड यांच्या मुलीच्या लग्नात आलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तब्बल 7 लाख रुपयांची मदत सशस्त्र सेना ध्वज फंडला दिली आहे. धारोड यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी धारोड यांना पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले.  

धिरज धोराड ठाणे येथील वसंत विहार येथे राहण्यास असून ते माजी सैनिक तसेच सेवानिवृत्त सैनिकांना निवृत्तीनंतर रोजगार मिळावा यासाठी विशेष कार्य करतात. त्यांच्या मुलीचे गत 21 डिसेंबर रोजी लग्न होते. यावेळी लग्न समारंभासाठी उपस्थित नातेवाईक व मित्रमंडळींना पुष्पगुच्छ अथवा भेट वस्तू न आणता सशस्त्र सेना ध्वज निधी फंडामध्ये स्वच्छेने निधी जमा करण्याचे आवाहन धिरज धोराड यांनी केले होते. यावेळी लग्न कार्यालयात जिल्हा सैनिक स्टॉल उभारण्यात आला होता. धारोड यांच्या आवाहनाला सर्वांनी उत्तम प्रतिसाद देत 7 लाखाचा निधी जमा झाला होता. सदर रक्कम माजी सैनिक कल्याण निधीमध्ये जमा करण्यात आल्याचे धिरज धोराड यांनी सांगितले. त्यांच्या कार्यालायची दखल ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी घेऊन विशेष कौतुक केले.