नाईकांच्या समर्थकांनी बांधले शिवबंधन

सुरेश कुलकर्णींसह चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई : गत आठवड्यात आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेल्या भाजपच्या सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडले आहे. 

सुरेश कुलकर्णी हे आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पालिका निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत जाणार याबाबत चर्चा रंगली होती. तुर्भे स्टोअर येथे त्यांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे आदी शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. यावरून कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले होते. गेल्या आठवड्यात त्यांच्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचा पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या सेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर रविवारी त्यांनी तुर्भे परिसरातील तीन नगरसेवकांसह मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात सुरेश कुलकर्णी यांच्यासह राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे. याप्रसंगी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले व जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.