मेट्रोचे संचलन आणि देखभाल कोण करणार?

निविदांना प्रतिसाद न आल्याने सिडकोसमोर पेच

नवी मुंबई : डेडलाईन हुकलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्षभरात ही सेवा सुरु करण्याची सिडकोची योजना आहे. मात्र  मेट्रोचे संचलन आणि देखभालीसाठी कोणतीही कंपनी पुढे येताना दिसत नाही. यातच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीएने) मेट्रोची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु यावरही कोणता निर्णय झालेला नाही. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्यामुळे डिसेंबर 2019 पर्यंत नवी मुंबईत मेट्रो धावणार, असे चित्र रंगवण्यात आले होते. मात्र, मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न साकार होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधर मार्गावर एकूण 11 स्थानके आहेत. या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी अनेक स्थानकांचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे मेट्रोचे संचलन आणि देखभालीसाठी ठेकेदार नेमण्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या. या निविदांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सिडकोसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. सिडकोच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएने नवी मुंबई मेट्रो चालविण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही एमएमआरडीएची उपकंपनी आहे. या उपकंपनीच्या माध्यमातून नवी मुंबई मेट्रोचे संचलन आणि देखभाल करण्याची तयारी एमएमआरडीएने दर्शविली आहे. तसा प्रस्ताव सिडकोला सादर करण्यात आला आहे. मात्र त्यावरसुद्धा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते.