मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा टोल महागणार

1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार

मुंबई ः 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा टोल महाग होणार आहे. चडठऊउ ने हा निर्णय घेतला आहे. कारसाठी सध्या 230 रुपये मोजावे लागतात. तसंच टोल वसुलीचे अधिकार आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सला देण्यात आले आहेत. 

2017 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल 18 टक्क्यांनी महागला होता. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेसवेवरील टोलच्या दरात 18 टक्के वाढ होईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स एमएसआरडीला 8 हजार 262 कोटी रुपये देणार असून कंपनीला पुढील 15 वर्ष एक्स्प्रेसवेवरील टोल वसुलीचा अधिकार असेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल वसुलीचं काम ‘आयआरबी’कडे होतं. त्याची मुदत ऑगस्ट, 2019 मध्ये संपली होती. त्यामुळे निविदा काढल्या. सुरुवातीला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या टोल वसुलीच्या कंत्राटामध्ये अदानी ग्रुपने  रस दाखवला होता, परंतु त्यांनी नंतर माघार घेतली. मागवलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान केवळ ‘आयआरबी’चीच निविदा दाखल झाली होती. परिणामी हे कंत्राट आयआरबीला मिळालं. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘सहकार ग्लोबल कंपनी’कडे हंगामी स्वरुपात टोल वसुलीचे काम होतं.

कोणत्या वाहनासाठी किती टोल?

- कारसाठी सध्या 230 रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून हा दर 270 रुपये होणार आहे.

- मिनीबससाठी 355 रुपये घेतले जातात. नव्या दरानुसार आता 420 रुपये टोल भरावा लागणार आहे

- बससाठी 675 रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून टोलसाठी 797 रुपये मोजावे लागणार आहेत.

- ट्रक टू अ‍ॅक्सलसाठी सध्या 493 रुपये टोल घेतला जातो. 1 एप्रिलपासून हा टोल 580 रुपये होणार आहे

- क्रेन, अवजड वाहने तसंच टू अ‍ॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या 1555 रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून नव्या दरानुसार 1835 रुपये टोल आकारण्यात येईल.