महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

नवी मुंबई ः राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध म्हणून नवी मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार,25 फेब्रुवारी रोजी तुर्भे येथील सर्कल तहसीलदार कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते. महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकर्‍यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे महाआघाडीच्या राज्यसरकरला जाब विचारून तहसीलदार कार्यालयातील अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.