सिडकोच्या भूखंडांस विक्रमी दर

9 भूखंड विक्रीतून 220 कोटी प्राप्त

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे खारघर, नवीन पनवेल (प.) आणि सीबीडी बेलापूर येथील एकूण 9 भूखंड विक्री योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. सदर विक्रीतून सिडको महामंडळास अंदाजे 220 कोटी रूपये इतका महसुल प्राप्त झाला आहे. 

खारघर येथील भूखंड क्र. एफ92+एफ97 व भूखंड क्र. एफ96 करीता रु. 55,861, भूखंड क्र. 62बी करीता रु. 60, 939 आणि भूखंड क्र. 62सी करीता रु. 73, 635 इतका आधारभूत दर (प्रति चौ.मी.) निश्‍चित करण्यात आला होता. नवीन पनवेल (प.) येथील भूखंड क्र. करीता 7 व 8 करीता रु. 51, 604 आणि भूखंड 15 करीता रु. 63, 332 व भूखंड 22 करीता रु. 51, 604 इतका आधारभूत दर निश्‍चित करण्यात आला होता. सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्र. 3ए करीता रु. 68, 557 इतका आधारभूत दर निश्‍चित करण्यात आला होता. 

बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्‍चित करण्यात आला होता. या निकषानुसार सदर सर्व भूखंडांकरिता ई-लिलाव प्रक्रियेमध्ये उद्धृत करण्यात आलेली सर्वाधिक रकमेची बोली स्वीकारण्यात येऊन संबंधित अर्जदारांना यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले. भूखंडांच्या आधारभूत दरांपेक्षा या बोली सरासरी दुपटीने अधिक आहेत. सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्र. 3ए करीता कानेर बिल्डर्स न्ड डेव्हलपर्स यांच्यातर्फे उद्धृत करण्यात आलेली रु. 1,67,557 (प्रति चौ.मी.) ही सर्वात महत्तम बोली ठरली.