सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

मुंबई ः आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. यामुळे भाजपकडून विधानभवनात गौरव प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण, सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही असे सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला आहे. 

अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांरिषया आक्षेपार्ह लिखाण केल्याने त्या मासिकावर बंदी घालावी. सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे मत फडणवीसांनी मांडले. भाजपच्या या मागणीनंतर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, भाजपने जो प्रस्ताव मांडला आहे, त्याची तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊन सभागृहाचे कामकाज सुरू करावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकारता येत नाही असं म्हणत अजित पवार यांनी सर्वांचं एकमत असेल तर चर्चेला हरकत नसल्याचं म्हटलं. तसंच सावरकर यांचे अनेक स्मृतिदिन आले. आज पहिल्यांदाच आला नाही. सावरकर हे थोर देशभक्त आहेत. त्यांना आदरांजली अर्पण करतो. सभागृहात हा प्रस्ताव मांडताना काय राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात माहित नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधानांना दोन वेळा पत्र दिलं. पण मग अडचण काय आली, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.