सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवणार - गृहमंत्री

मुंबई : राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. येत्या 3 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे एफआयआर घेण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

 राज्यातील सर्व 1150 पोलीस स्टेशन्समध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे पोलिसांच्या मध्यवर्ती कंट्रोल रूमला जोडले जाऊन त्याच्या फीडचे रेकॉर्डिंगसुद्धा होणार आहे. देशमुख म्हणाले हे कॅमेरे लोकांना गेटमधून आत जाताना, एफआयआर नोंदवण्याच्या ठिकाणी, कॉरिडॉरमध्ये आणि लॉकउपमध्ये लावण्यात येतील. पोलीस स्टेशनमधील चेंजिंग रूम सोडले तर सर्व ठिकाणी या कॅमेर्‍याची नजर असेल. पोलीस तक्रार घेत नाहीत, ही तक्रारसुद्धा जुनी असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र नव्याने सुरू झालेल्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये लोकांना ऑनलाइन तक्रार करायची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईत सध्या 5 हजार सीसीटीव्ही आहेत. यात आणखी 5 हजार सीसीटीव्हींची भर पडणार आहे. यासोबतच पुण्यातही सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. नव्या इमारतींनाही सीसीटीव्ही लावणं बंधनकारक असणार आहे. या इमारतींच्या सीसीटीव्हीचा एक कंट्रोल पोलिसांकडेही असेल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.