सहा बालकामगारांची सुटका

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व कामगार आयुक्तालयाने मंगळवारी दुपारी तुर्भे गाव व एपीएमसी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून सहा बाल कामगारांची सुटका केली. तसेच या बालकामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन राबवून घेणार्‍या पाच आस्थापना चालकांना ताब्यात घेण्यात आले. 

 बालकामगार या अनिष्ठ प्रथा असून ती राबवणे हा गुन्हा आहे तरी स्वतःच्या फायद्यासाठी काही आस्थापनांमध्ये बालकामगार ठेवून त्यांना राबवून घेतले जाते. तुर्भे गाव व एपीएमसी मार्केट परिसरातील काही दुकाने व हॉटेलमध्ये बालकामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचे तसेच त्यांच्याकडून कमी वेतनात अतिश्रमाचे काम करून घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जून गरड यांना मिळाली होती. त्यानुसार गरड यांनी या आस्थापनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भोर व त्यांच्या पथकाने ठाणे कामगार आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील दुकाने निरीक्षकांसह मंगळवारी संयुक्तरित्या छापे टाकले. या सर्व मालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या आस्थापनामध्ये बालकामगारांना कमी वेतनामध्ये ठेवून तसेच त्यांच्याकडून जास्त श्रमाचे काम करून घेऊन त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण केल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व आस्थापनांच्या मालकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुन्हे दाखल करून सगळ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.