एक दिवसच नाही तर आयुष्य मराठीमय व्हावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरद्गार 

मुंबई : मराठी भाषा अभिजात आहेच. तिला संपवण्याची कुणाची हिंमत नाही. केवळ एक दिवसच नाही तर आयुष्य मराठीमय व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच बये दार उघड म्हणणारी मराठी होती अन् सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारणारीही मराठी भाषाच होती, असे गौरद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. विधानभवन परिसरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज विधानभवन, मुंबई येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री Aअजित पवार,मराठी भाषा मंत्री सुभाष मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा दिनानिमित्त आज विधान भवनात मराठी भाषेचा जागर करण्यात आला. विधान भवनात ग्रंथ दिंडी आणण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही ग्रंथ दिंडी खांद्यावर वाहून आणली. त्यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ उपस्थित होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन केले. विधान भवन प्रांगणात बारा बलुतेदारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या बारा बलुतेदरांनी आपली कला इथे सादर केली. या कार्यक्रमस्थळी मायमराठीसाठी सर्वजण एकत्र येणे हे अनोखं दृश्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपण सगळे इथं येऊन आईचा सन्मान करत आहोत. पहिले ते दहावी मराठी भाषा सक्तीची हे विधेयक बुधवारी मांडलं गेले तेव्हा पहिल्यांदा मला सभागृहात बसावसं वाटल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. प्रत्येक भाषेला परंपरा आणि वारसा आहे, तो जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मराठीचं काय होणार? ही दीन भावना आपल्या मनात का येते? मराठी भाषा दिन साजरा करताना चिंता का असते? अशा गोष्टी होता कामा नये. कारण, मराठी ही जिजाऊंची भाषा आहे. मराठीने काय दिलं? आपण इतिहास चिवडत असताना काही शिकत नाही. मराठी भाषा, संस्कृती टिकली पाहिजे, म्हणजे काय? आपल्याकडे शाळांची नाव मराठीत का नाही? संत तुकाराम, संत नामदेव, अशी नावं आपल्या शाळांना का नाहीत? असेही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले.