के.एल.ई. महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

नवी मुंबई : जेष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा जन्मदिन म्हणून के. एल. ई. महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन के. एल. ई. वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम गिरी व तसेच विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनकर गित्ते यांच्या हस्ते करण्यात आले.  

मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी विभागातील शोभा नाचण यांनी केली. मराठी भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा असून आपण सर्वानी तिचे जतन करणे गरजेचे असल्याचे डॉ. घनश्याम गिरी यांनी प्रोत्सहानपर मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन, भाषण, नृत्य, काव्यवाचन, नाटक या माध्यमातून मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलेतून मराठी भाषा कशी जोपासली जाऊ शकते यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी के.एल.ई. संस्थेचे विधी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व सर्व शिक्षकउपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.