7 महिन्यांत 500 कोटी 11 लाखांचा मालमत्ताकर वसूल
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 30
डिजिटल पेमेंट्स सुविधा आणि जनजागृती मोहीमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत तब्बल 500 कोटींपेक्षा अधिक कर संकलन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. कर संकलनातील ही झेप लोकाभिमुख उपक्रम, डिजिटल पेमेंट्सला दिलेले प्रोत्साहन तसेच करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती मोहिमांमुळे तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे सांगितले आहे.
मालमत्ताकर विभागाच्या या यशामागे नागरिकांचा सहभागासोबतच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियोजनबद्ध धोरणे महत्त्वाची ठरली असून या उपाययोजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीमध्ये कर वसूलीचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे मालमत्ताकर विभागाने सांगितले. कर संकलनात वाढ होण्यासाठी महानगरपालिकेने यंदा डेटा विश्लेषणावर आधारित नाविन्यपूर्ण पध्दतीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये करसंकलनात वाढ साध्य करण्यासाठी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांची माहिती अद्ययावत करणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत माहितीचे सखोल विश्लेषण, कर संकलन मोहिमेचे धोरणात्मक नियोजन आणि माहिती संकलनासाठी विकसित केलेले मोबाईल ॲप्लिकेशन अशा सर्व घटकांच्या माध्यमातून करसंकलनात लक्षणीय वाढ झाली. याचा परिणाम म्हणजे, आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर संकलन झाले आहे, असे मालमत्ताकर विभागाने स्पष्ट केले. नवी मुंबई महानगरपालिका पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारासाठी कटिबद्ध असून, या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या विकास कामांसाठी केला जाणार आहे असे सांगतानाच आयुक्तांनी करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत. आगामी काळात थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महानगरपालिकेने आता मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरून थकबाकीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.
- ऑनलाईन कर भरण्यास नागरिकांकडून प्राधान्य
नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने डिजिटल पेमेंट पद्धतींचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे केला. व्हॉट्सॲप चॅटबॉट, ॲप, पालिकेची अधिकृत वेबसाईट, कर देयकांवरील क्यूआर कोड स्कॅनिंग तसेच विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याची सुविधा - यांसारख्या ऑनलाईन पर्यायांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला. ऑनलाईन करभरणा माध्यमातून रू.313 कोटी 70 लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले.
असा वसूल झाला मालमत्ता कर !
- नमुंमपाच्या आठ विभागांतील 1 लाख 63 हजार 23 मालमत्ताधारकांकडून 500 कोटी 11 लाख रुपयांचे कर संकलन झाले.
- सर्वात जास्त मालमत्ता कर नेरूळ विभागातून जमा झाला : 106 कोटी 79 लाख रुपये
- ऑनलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन : 313 कोटी 70 लाख रुपये
- ऑफलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन : 186 कोटी 41 लाख रुपये
मालमत्तेच्या प्रकारानुसार झालेले कर संकलन
- निवासी मालमत्ता : 35 टक्के
- अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता : 23.84 टक्के
- औद्योगिक मालमत्ता : 32.45 टक्के
- मिश्र व इतर मालमत्ता : 8.71 टक्के
नवी मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट केवळ कर संकलनात वाढ करणे नाही, तर नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सोयीस्कर व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. भविष्यात स्मार्ट सिटी संकल्पनेशी सुसंगत असे अधिक डिजिटल उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून ज्यायोगे नागरिकांचा वेळ वाचेल आणि कामकाज अधिक पारदर्शक बनेल. करसंकलनातील हे यश केवळ महानगरपालिकेचे नाही, तर प्रत्येक जबाबदार करदात्याचे आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून दाखवलेली जबाबदारीची जाणीव आणि विश्वास समाधानकारक असून शहर विकासाला हातभार लावणारा आहे.- पालिका आयुक्त, डॉ.कैलास शिंदे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai