डॉलर्स देण्याच्या आमिषाने तीन लाखांची फसवणुक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 53
नवी मुंबई : स्वस्त दरात अमेरिकन डॉलर्स देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका तरुणाकडून तीन लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या टोळीचा छडा लावण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत मुंब्रा येथून या प्रकरणातील सहा आरोपींना अटक केली आहे. या टोळीच्या चौकशीत त्यांनी डॉलर्स देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे सदर टोळी झारखंड गँगशी संबंधित असल्याचे तपासात आढळुन आले आहे.
कांदिवली येथे राहणारा या प्रकरणातील तक्रारदार मोहम्मद आफिफ सिद्दीकी (वय-33) याला गत 18 ऑक्टोबर रोजी सदर टोळीने संपर्क साधुन त्यांच्याकडे असलेले अमेरिकन डॉलर्स स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवले होते. स्वतःचे नाव रफीक असे सांगणाऱ्या या टोळीतील आरोपीने ओळखीतील लोकांची नावे सांगून मोहम्मद सिद्दीकी याचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर रफीक याने सासरी जुन्या सोपयातून 1,751 डॉलर नोटा (किंमत 20 डॉलर) सापडल्याचा खोटा बनाव रचला. त्यानंतर या टोळीने मोहम्मद सिद्दीकी याला घणसोली मध्ये बोलावून त्याला एका खऱ्या डॉलर नोटीची पडताळणी करुन दाखवत त्याचा विश्वास संपादन केला. अंतिम व्यवहाराच्या वेळी या टोळीने मोहम्मद सिद्दीकी याच्याकडून 3 लाखांची रोख रक्कम घेऊन त्याला रुमालात गुंडाळलेले नोटांच्या आकाराचे कागदी बंडल देऊन त्या ठिकाणावरुन पलायन केले होते. त्यानंतर फसवणुक झालेल्या मोहम्मद सिद्दीकी याने रबाळे पोलीस ठाणे मध्ये धाव घेतल्यानंतर पोलिसांनी अज्ञात टोळी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रबाळे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (प्रशासन) बनसोडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात यांच्या पोलीस तपास पथकामध्ये पोलीस हवालदार दर्शन कटके, मयूर सोनवणे, पोलीस नाईक गणेश वीर, धनाजी भांगरे, पोलीस शिपाई मनोज देडे यांचा समावेश होता. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही तपासाच्या आधारे कौसा, मुंब्रा मधील दो मटका चाळ मध्ये राहणाऱ्या मोहम्मद राहुल लुकमान शेख उर्फ रफीक (वय-35), आलमगीर आलम सुखखू शेख (वय-27), खोसमुद्दीन मोहम्मद शेख उर्फ येलीम (वय-23), रिंकू अबुताहीर शेख (वय-26), रोहीम बकसर शेख (वय-34), अजीजुर रहमान सादिक शेख (वय-37) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना या गुह्यात अटक केली. या टोळीच्या चौकशीत त्यांचा झारखंड गँगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याकडून रबाळे पोलीस ठाणे मधील दाखल आणखी दोन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai