नियोजित कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 05, 2025
- 62
नागरी सुविधा कामांचा घेतला आढावा
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात नमूद बाबींच्या अनुषंगाने संबधित विभागांनी त्यावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत घेत नियोजित कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
नागरिकांकडून रस्त्यांबाबत तक्रारी प्राप्त होत असून या रस्ते सुधारणा कामांना वेग द्यावा असे निर्देश देत रस्ते देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करावी असे आयुक्तांनी सूचित केले. यामध्ये कोणत्याही प्रकारची सबब चालणार नाही असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. अद्यापही पाऊस पडत असल्याने रस्ते दुरुस्ती कामाला अडथळा येतो हे लक्षात घेतले तरी जशी पावसाची उघडीप मिळेल तशी रस्ता दुरुस्ती कामे प्राधान्याने करावीत असेही निर्देशित केले. पावसामुळे रस्त्यांच्या कडेला चिखल साचत असून ऊन पडल्यावर या चिखलाची धूळ होऊन मोठया प्रमाणावर हवेत पसरते. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत रस्ते धुण्यासाठी महापालिकेकडे असलेल्या वाहनांचा अधिक प्रभावी वापर करावा व त्याकरिता मलप्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रियाकृत शुध्दीकरण केलेले पाणी वापरावे असेही निर्देश देण्यात आले.
मुख्य मार्गांच्या सखोल स्वच्छता मोहीमा नियमितपणे राबवाव्यात याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी ड्रेनेजवरील तुटलेली झाकणे बदलण्याची मोहीम हाती घ्यावी असे निर्देश दिले. अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून ते रोखण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाया करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी अनधिकृत होर्डींग विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या बाबीवर नियंत्रणासाठी विभाग कार्यालय स्तरावर अराजकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या बैठका विभाग कार्यालयामार्फत नियमितपणे घ्याव्यात व त्यामध्ये वारंवारिता ठेवावी असेही आयुक्तांनी सांगितले. स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण विषयक बाबींकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या अनुषंगाने विभाग कार्यालय स्तरावर दक्षता समिती स्थापन करावी व समितीमार्फत शहराची हवा गुणवत्ता सुधारणा तसेच प्रदूषण विषयक इतर बाबींकडेही काटेकोर लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.
महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार कार्यवाही सुरू ठेवावी तसेच प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या कामासोबतच मतदान केंद्रे निश्चित करणे कामालाही समांतरपणे गती द्यावी असेही निर्देश आयुक्तांनी निवडणूक विभागाला दिले. अर्थसंकल्पात नमूद सुविधा कामांचा विभागनिहाय आढावा घेताना प्रत्येक विभागाने त्यांच्यामार्फत सुरु असलेली कामे जलद पूर्णत्वास न्यावीत व नियोजित कामांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया तातडीने कराव्यात असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. यामध्ये विविध प्रकल्प सुविधा यांच्या सुरू असलेल्या व नियोजित कामांवरील कार्यावहीत गतिमानता आणणे, विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण, महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीला प्राधान्य, तृतीयपंथी नागरिकांच्या विकासासाठी उपक्रम राबविणे, लोककल्याणकारी विविध योजनांची अंमलबजावणी, आयएसएस प्रशिक्षण केंद्रे तसेच नवीन ईटीसी केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही, शाळांमधील डिजीटल बोर्ड, नमुंमपा शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन, अभिलेख डिजीटलायजेशन, एकल वापर प्लास्टिक विरोधातील प्रतिबंधक कारवायांना वेग, वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रात निर्मीत वस्तू विक्रीसाठी प्रभावी उपाययोजना, स्वच्छश्री पुरस्काराव्दारे नागरिक व संस्थांना प्रोत्साहन, सुरु असलेल्या व नियोजित प्रकल्प आणि सुविधा कामांना वेग देणे, पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा सोसायट्यांमधील वापरासाठी पायाभूत सुविधा निर्मिती, नाला व्हिजन राबविण्यासाठी कृती आराखडा, शहर पर्यटन आराखडा, गुणनियंत्रण कक्ष अशा विविध बाबींबाबत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सविस्तर माहिती घेतली व कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणारी नागरी सुविधा कामे ही नागरिकांच्या गरजा व मागणी लक्षात घेऊन त्याची आवश्यकता पडताळून केली जात आहेत. याव्दारे नागरिकांना होणारी असुविधा दूर करण्याला प्राधान्य दिले जात असून त्यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून नागरिकांना अपेक्षित सुविधा कामे करण्याकडे विशेष लक्ष द्यावे असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीप्रसंगी निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि इतर विभागप्रमुख, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai