मतदार यादी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 63
आयुक्तांचे आढावा बैठकीत निर्देश
नवी मुंबई ः महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग रचना व आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने पार पडली असून प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्दी विषयक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे. या विषयी तसेच मतदान केंद्र निश्चिती विषयी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत विहीत वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश संबधित अधिकारी, कर्मचारीवृंदांना दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदार यादी तयार करत नसून भारत निवडणूक आयोगाकडून तयार होणारी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येते. या करिता 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करुन मतदार यादी तयार करण्यात येते. ही प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार प्रसिध्द केली जाणार असून त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी कालावधी दिला जाणार आहे.
या प्रारुप मतदार यादीत नव्याने कोणतेही नाव समाविष्ट होणार नसून प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीत - (1) लेखनिकांच्या काही चुका असल्यास, (2) दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास, (3) संबधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे समाविष्ट करणे, (4) मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास त्यांची नोंद मार्क कॉपी मध्ये घेणे केवळ अशा प्रकारची सुधारणा, दुरुस्ती करता येईल.
विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करुन आवश्यक त्या सुधारणा मतदार यादीमध्ये करण्यासाठी व अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून विभाग प्रमुख व त्यांना सहाय्यक म्हणून इतर अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परस्पर समन्वयाने नियमानुसार काम करावे असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. या मतदार यादीत विषयक कामकाजाकरिता परिमंडळ 2 चे उपआयुक्त संजय शिंदे यांची प्राधिकृत व नियंत्रक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या समन्वयाने बिनचूक अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे.
अशाच प्रकारे मतदान केंद्र निश्चितीबाबत आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. मतदान केंद्राच्या जागा निश्चित करतांना विधानसभा निवडणूकीसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने महापालिका निवडणूकीसाठी एका मतदान केंद्रावर सरासरी 800 ते 900 मतदारांचे मतदान असावे असे आयुक्तांनी सूचित केले. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत याबाबतची माहिती पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच मतदान केंद्र निश्चितीबाबतही निकषांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीप्रसंगी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai