नवी मुंबईत साकारणार बालभवन

बालभवनासाठी भुखंड देण्याची मागणी ः आ. म्हात्रेंचे सिडको एमडींना निवेदन

नवी मुंबई : शहरात अनेक बालकलाकार निर्माण होत आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी महानगरपालिकेला हक्काचे सांगीतिक व्यासपीठ गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेला सिडकोने भुखंड उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर संचालकांनी संबंधित विभागाला भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ आदेश दिले आहेत. 

तबलावादक, गायन, हार्मोनियम, बासुरी, वीणा आणि संगीतातल्या इतर दुर्मिळ वाद्यांच्या माध्यमातून या बालकलाकारांनी आपली ओळख निर्माण केली आहे. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला हक्काचे सांगीतिक व्यासपीठ असणे गरजेचे आहे. सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिल्यास नवी मुंबईच्या विकासात बालभावनाच्या रूपाने भरच पडणार आहे. भविष्यात नवी मुंबई कलाकारांची नगरी म्हणून नावारूपाला येईलच; परंतु त्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे. नवी मुंबईतील बरेचसे पालक आपल्या मुलांच्या संगीतप्रेमापोटी मुंबई गाठतात. यामुळे पैसा, वेळ वाया जातोच तसेच या धक्काधक्कीत पाल्या आणि पालक दोघांचीही ससेहोलपट होत आहे. आताच्या घडीला विविध शैक्षणिक संस्थामुळे नवी मुंबईला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जात आहे. यापुढे ती बालकलाकारांनी पंढरी म्हणून ओळखली जायला हवी. नवी मुंबईत सिडकोच्या राखीव असलेल्या भूखंडांपैकी एक भूखंड बालभवनसाठी देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी बेलापूर विधानसभेच्या आ.मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सिडकोच्या संबंधित विभागाला बालभावनाकरिता भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ आदेश दिले.