यांत्रिकी साफसफाईच्या लेखापरिक्षणाला बगल

नवी मुंबई ः शासनाने दिलेले पालिकेच्या यांत्रिकी साफसफाई कामाचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश डावलून स्थानिक लेखा निधी विभागाने नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2015-16 चे सर्वसाधारण लेखापरिक्षण सुरु केले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील यांत्रिकी साफसफाई कामातील कोट्यवधींच्या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकार्‍यांना तसेच तत्कालीन मुख्य लेखापरिक्षकांना व मुख्य वित्त व लेखा अधिकार्‍यांना वाचवण्यासाठी स्थानिक लेखा निधी विभागाने ही भुमिका घेतल्याची चर्चा आहे. 

‘आजची नवी मुंबई’ने जानेवारी 2018 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील यांत्रिकी पद्धतीने विविध रुग्णालयात झालेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ठेकेदाराने  निविदा अटीशर्तींनुसार सामानाचा पुरवठा न करताही त्याला कशापद्धतीने संपुर्ण देयके अदा करण्यात आली याचा पुराव्यासह घोटाळा उघडकीस आणल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने संबंधित कामाचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश संचालक स्थानिक लेखा निधी संचालनालयाला मे 2019 मध्ये देऊन तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सुरुवातीला लोकसभेचे अधिवेशनाचे कारण सांगून संबंधित विभागाने वेळकाढूपणा केला. त्यानंतर राज्यातील निवडणूकीचे कारण देत वेळ मारुन नेली. कधी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण देत गेले वर्षभर स्थानिक लेखा निधी संचालनालय याबाबत चालढकल करत आहे. 

सरतेशेवटी 24 फेब्रुवारीपासून स्थानिक लेखा निधीच्या लेखापरिक्षकांनी पालिकेचे लेखापरिक्षण करण्यास सुरुवात केली असून शासनाने दिलेल्या आदेशाला मात्र बगल दिली आहे. संंबंधित लेखापरिक्षकांकडे चौकशी केली असता त्यांनी आम्हाला पालिकेचे सन 2015-16 चे लेखापरिक्षणाचे आदेश असल्याचे सांगितले. म्हणजेच आजही संबंधित विभागाला यांत्रिकीकरणाने साफसफाई कामाचे विशेष लेखापरिक्षण करायचे नसल्याचे दिसत असून  जेवढी चालढकल करता येईल तेवढी करायची आहे. या घोटाळ्यात ठेकेदारांसह पालिकेचे अधिकारी, शासनाचे प्रतिनियुक्तीवर आलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच मुख्यलेखा परिक्षक अडकले असून त्यांच्या बचावासाठी स्थानिक लेखा निधी विभागाकडून वेळकाढूपणा धोरण अवलंबल्याची चर्चा आहे. 


सोमवारपासून यांत्रिकी सफाई कामाचे विशेष लेखापरिक्षण हाती घेणार असुन अतिरिक्त मनुष्यबळ पुरवून लेखापरिक्षण अहवाल शासनाला सादर करणार.

- सुनील भोसले,संचालक, स्थानिक लेखा निधी