आघाडीतील बिघाडीवर नाईकांची मदार

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग रंगणार असून यात भाग घेण्यासाठी अनेक हौश-नवशे-गवशे सोशल मिडियात सक्रिय झाले आहेत. तुर्भेतील सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या चार नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने सध्या नवी मुंबईत महाविकास आघाडीचा बोलबाला आहे. असे असले तरी या आघाडीतील बिघाडीवर विजयाची मदार असल्याने घडणार्‍या घडामोडींवर नाईक बारीक लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग तुर्त यशस्वी झाल्यानंतर त्याचे प्रयोग राज्यात सर्वत्र होताना दिसत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना गणेश नाईकांची नवी मुंबईतील सत्ता घालवण्यासाठी महाविकास आघाडीमार्फत निवडणुक लढवणार आहेत. नुकतेच तुर्भ्याचे गणेश नाईकांचे तीस वर्षाचे विश्‍वासू सहकारी सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या तीन समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने नाईकांना मोठा धक्का बसल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. त्याचबरोबर तुर्भ्यातील कै. डी.आर. पाटील यांचे कुटुंबिय हे राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या नवी मुंबईत महाविकास आघाडीचा बोलबाला जरी असला तरी स्थानिक पातळीवर मात्र  वेगळे चित्र दिसत आहे. या बदलाची जाणीव माजी मंत्री गणेश नाईक यांना असून ते नवी मुंबईत घडणार्‍या राजकीय घटनांवर लक्ष ठेवून असून त्यांनी साधलेल्या चुप्पीमुळे विरोधक गोंधळात आहेत. 

गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षातील असंतूष्टांना हाताशी धरुन गणेश नाईकांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपली राजकीय नौका तिरावर लावली आहे. यावेळीही काँग्रेस पक्षाचे रमाकांत म्हात्रे किंवा संतोष शेट्टी यांचा गट तिकीट वाटपावरुन महाआघाडीत विघ्न आणून गणेश नाईकांना मदत करण्याची शक्यता आहे. अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने त्यांनी ऐनवेळी जादा प्रभागांवर हक्क सांगितल्यास महाविकास आघाडीचा प्रयोग फसण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत होणार्‍या अनेक सामाजिक उपक्रमात काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे फोटो टाकत नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे संभाव्य उमेदवार नसल्याने शिवसेनेने एकट्यानेच निवडणुक लढवावी असा दबाव ईच्छक उमेदवारांनी शिवसेनेवर वाढवला आहे. महाविकास आघाडी झाल्यास सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसणार असून शिवसेनेतील अनेकांनी बंडखोरीची तयारी केली आहे. 

गणेश नाईकही या घडणार्‍या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील अनेक संभाव्य बंडखोरांशी संधान साधून असल्याचे बोलले जात आहे. या बंडखोरांना निवडणूकीत रसद पुरवून महाआघाडीचा खेळ बिघडवण्याची तयारी गणेश नाईकांनी आतापासूनच सुरु केल्याने यावेळची निवडणुक चुरशीची होणार असल्याचे राजकीय समिक्षकांचे मत आहे. महाविकास आघाडीची जरी हवा वाटत असली तरी नवी मुंबईच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवणारे गणेश नाईकांना महाविकास आघाडीतील बिघाडी तारुन नेईल असे बोलले जाते. शिवाय भाजपानेही ही निवडणुक प्रतिष्ठेची केल्याने त्यांच्याही अनेक संघटनांचे व कार्यकर्त्यांचे बळ त्यांना मिळणार असल्याने या निवडणुकीत भाजपा नाईकांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्याचा विश्‍वास व्यक्त करत आहे.