विमानतळाच्या कामांत सिडकोची अनियमितता

मुंबई : ‘सिडको’मधील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांत गैरकारभार झाल्याचा अहवाल कॅग ने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला. हा अहवाल विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. त्यात सार्वजनिक उपक्रमांच्या कारभारावरील प्रकरणांत सिडकोच्या प्रकल्पांमध्ये काम देताना झालेल्या अनियमिततांवर बोट ठेवण्यात आले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात काही कामे देताना आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा प्रकाशित न करताच कंत्राटदारांना कामे देण्यात आली. तसेच जवळपास 690 कोटी           रुपयांच्या सहा कंत्राटांमध्ये कमीत कमी विहित किंमत मूल्याच्या कामाचा अनुभव नव्हता तरीही त्यांना कामे प्रदान करण्यात आली. 10 कंत्राटांमध्ये विद्यमान कंत्राटदारांना अतिरिक्त कामे निविदा न मागवताच देण्यात आली, असे आक्षेप घेण्यात आल्याची बाब समोर आली. ही कामे झाली त्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि सिडको ज्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येते तो विभाग फडणवीस यांच्याकडे होता, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.