कासाडी नदीत रसायन सोडणार्‍यांना अटक

पनवेल ः कासाडी नदीपात्रात घातक टाकाऊ रसायन दोन टँकरद्वारे सोडणार्‍या स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हे घातक रसायन महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘हायकल’ कंपनीतून आणण्यात आले होते.

नदीपात्र प्रदूषित झाल्याने येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. कळंबोलीतील गुरुद्वाराशेजारील नागरिकांनाही या प्रदूषणाचा त्रास जाणवू लागल्याने स्थानिक तरुणांनी नदीपात्र प्रदूषित करणार्‍यांवर गेल्या दोन आठवड्यांपासून पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी मध्यरात्री या नदीपात्रात दोन टॅँकर रिकामे करण्यात येत असल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित हा प्रकार रोखत टँकर चालकांना पकडले आणि कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. राम आशीष, राम सुख यादव, पवनकुमार यादव अशी या टँकर चालकांची नावे आहेत. टँकरच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास तळोजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक तरुण आणि पर्यावरणप्रेमींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, रात्रीच्या वेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता प्रदूषण मंडळाचे अधिकारी तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी तिन्ही टँकर चालकांविरोधात भादंसं 277, 278 पर्यावरण रक्षणाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.