सिडको गृहनिर्माण प्रकल्पाला राष्ट्रवादीचा विरोध

पनवेल ः सिडकोच्या खांदेश्‍वर, मानसरोवर या रेल्वे स्थानकाजवळील प्रस्तावित गृहप्रकल्पाला स्थानिकांसह राजकीय पक्षाने विरोध केल्याने हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी रविवारी दुपारी खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकालगतच्या दोन्ही प्रकल्पांची पाहणी केली. तात्काळ नगरविकास मंत्र्यांकेड बैठक लावावी अशी सुचना खासदार सुनील तटकरे यांनी केली. 

रेल्वे स्थानकातील वाहनतळाची सध्याची वाहनक्षमता लक्षात घेता वाहनतळ, बसस्थानक आणि मोकळी जागा येथे गरजेची असल्याचे मत अनेक मंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. पूर्वनियोजित बैठकीत ऐनवेळी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र अनुपस्थित राहिल्याकडे खासदार सुनील तटकरे यांनी रहिवाशांचे लक्ष वेधले. कामोठे येथील नागरी हक्क समिती तीन महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. नवी मुंबई, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, तळोजा, रोडपाली येथील वाहनतळ, बसस्थानकाच्या जागांवरील आरक्षण बदलून 95 हजार घरांचा महागृहनिर्माण प्रकल्प घाईघाईने राबण्यासाठी वेगवेगळ्या परवानग्यांना फाटा देण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात मैदाने आणि उद्यानांची आरक्षणे बदलताना मंत्रिमंडळात त्याबाबतचा निर्णय घेतला जात असल्याकडे खासदार तटकरे यांनी लक्ष वेधले.

आंदोलने करूनही सिडको मंडळाचे उच्चपदस्थ सामाजिक प्रश्नांकडे कानाडोळा करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यामुळे खासदार तटकरे यांनी रविवारी प्रकल्पाच्या जागेची दोन राज्यमंत्र्यांसह पाहणी केली. बैठकीत सिडकोच्या नियोजनशून्य कारभारावर बोट ठेवण्यात आले. खांदेश्वर आणि मानसरोवर या दोनही रेल्वेस्थानकापासून 20 पावलांच्या अंतरावर वाहनतळ आणि बसस्थानकाच्या नियोजित जागेवर 14 मजली 17 टॉवर उभारले जाणार असल्याने येथे बजबजपुरी माजेल. सध्या रेल्वे स्थानकाचे वाहनतळ फुल्ल असताना रहिवाशी इमारतींमध्ये मल्टीस्टोरेज वाहनतळ उभारणे गैरसोयीचे होणार असल्याचे तटकरे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना तातडीने सोमवारीच मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांची भेट घेणार असून या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी दोन्ही राज्यमंत्र्यांनी केली.