नगरसेवकांत सिडकोविषयी नाराजी

पनवेल ः नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची दखल सिडको अधिकार्‍यांकडून घेतली जात नाही. केवळ आश्‍वासनांवर बोळवण केली जाते. सिडको वसाहतीतील गैरसोयींची दखल घेतली जात नसल्याने नगरसेवकांसह नागरिकांनी सिडको अधिकार्‍यांबाबत संताप व्यक्त केला. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सिडको हद्दीतील समस्या जाणून घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत त्यांनी सिडकोवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

सिडकोहद्दीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मंगळवारी कामोठे येथे सिडकोच्या कम्युनिटी सेंटरमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सिडकोचे एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सीताराम रोकडे यांना नागरिक आणि नगरसेवकांच्या रोषाचा सामना करावा लागला. सिडको हद्दीतील नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे, अपुरा पाणीपुरवठा, अतिक्रमण आदी विषयांवर तक्रारी केल्या. महापालिकेची स्थापना होऊनही सिडकोचे अधिकारी कामे करीत नसतील तर महापालिकेचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अनेक सोसायटीधारकांनी लेखी तक्रारींची निवेदन उपमहापौरांकडे दिली. केवळ नागरिकांनी सिडकोच्या अधिकार्‍यांबाबत संताप व्यक्त केला नाही तर सिडकोचे अधिकारी नगरसेवकांच्या सूचनादेखील ऐकत नसल्याचा आरोप नगरसेविका संतोषी तुपे यांनी केला. सिडकोकडे तक्रार करूनही काम केले जात नाही. अधिकारी केवळ वेळ मारून नेण्याचे काम करतात. महापालिका सिडकोच्या भूमिकेला वैतागली आहे, आमचे दुर्दैव आम्ही सिडकोहद्दीतून निवडून आलो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर नगरसेविका हेमलता गोवारी यांनी नाराजी व्यक्त केली. एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सीताराम रोकडे यांनी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरावर अरूण भगत यांनी सिडकोचे अधिकारी धादांच खोटे बोलत असल्याचा आरोप केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मागण्यांची दखल घेऊन सिडको हद्दीत अनेक कामे सुरू आहेत, आजच्या बैठकीत उपस्थित केल्या गेलेल्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन रोकडे यांनी दिले.

महिन्याच्या प्रत्येक 3 तारखेला जनता दरबार

उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सिडकोहद्दीतील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला वेगवेगळ्या वसाहतीत जनता दरबार बोलविण्यात येणार असल्याची घोषणा केली. नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन तक्रारी सोडवा, असे आवाहन त्यांनी केले.