आता फाशीचा मार्ग मोकळा

राष्ट्रपतींनी निर्भयाचा दोषी पवनची दया याचिका फेटाळली

नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशाला हादरवणार्‍या निर्भया गँगरेप केसमधील दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आज राष्ट्रपतींनी दया याचिकादेखील फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते. 

पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. पवनचे वकील एपी सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा फेटाळण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पवनने दाखल केलेल्या या याचिकेवर 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. चार दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती आहे.

दिल्ली कोर्टाने 17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी द्यायचा निर्णय दिला होता. आतापर्यंत कोर्टाने या चौघांसाठी तीन वेळा डेथ वॉरंट जारी केलं आहे. पहिल्या दोन वेळेला दोषींनी कायद्याचे दार ठोठावल्याने फाशीची तारीख पुढे ढकलावी लागली. तिसर्‍यांदा डेथ वॉरंट जारी झालं होतं. पण याहीवेळी फाशीच्या आधी दोन दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या.