वाशीत उभारला सनसेट पॉईंट

नवी मुंबई ः सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबइमध्ये पालिकेमार्फत शहर सुशोभीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. वाशी सेक्टर 8 येथील वीर सावरकर उद्यानात 35 फुटी सनसेट पॉईंट उभारला आहे. उद्यानाच्या शेजारीच खाडी किनारा असल्याने या सनसेट पॉइंटवरून सन राईज व फ्लेमिंगो पाहता येणार आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमींनी आंनद व्यक्त केला असून सकाळ-संध्याकाळी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. 

पालिकेने याधीच अनेक पडीक जागांवर हिरवळीचे पट्टे, त्यात रंगीबेरंगी फुले लावून आकर्षक केले जात आहेत. त्यामुळे नवी मुंबईला सौंदर्य प्राप्त झाले आहे. वाशीत पालिकेने उभारलेल्या सनसेट पॉईंटमुळे निर्सगप्रेमी सुखावले आहेत. यासाठी पालिकेने 72 लाख रुपये खर्च केले आहेत. खाडी किनार्‍याला टेकलेल्या उद्यानाच्या जागेत हा सनसेट उभारला गेला आहे. मुख्य म्हणजे खाडीत असणारी कांदळवनांची वाढलेली उंची लक्षात घेत या सन सेट पॉईंटची उंची ठरवण्यात आली आहे. याआधी पामबीच मार्गावर असलेल्या उंच इमारतींवरून अथवा वाशी खाडी पुलावरून नागरिकांना खाडी व खाडीच्या आजूबाजूला वावरणार्‍या पक्षांना न्याहाळता येत होते. मात्र आता या सनसेट पॉइंटमुळे कांदळवनापालिकडे लपलेले खाडीतील वन्यजीवांचे सौंदर्य न्याहाळता येणार आहे. एखाद्या अभयारण्यात प्राणी न्याहाळण्यासाठी ज्या पद्धतीने रचना केली जाते त्या पद्धतीने हा पॉईंट उभारण्यात आला आहे. नवी मुंबईला खाडी किनारा लाभलेला असला तरी वाशातील उभारलेला हा पॉईंट नवी मुंबईतील एकमेव पॉईंट ठरला आहे. दोन माजल्यांचा हा पॉईंट असून एकावेळी 20 ते 22 जण उभे राहून निसर्ग न्याहाळू शकतात. याबाबत पक्षी प्रेमी व निसर्ग प्रेमींनी आनंद व्यक्त केला असून पहाटे अनेक पक्षी प्रेमी आपला कॅमेरा घेऊन निसर्ग सौंदर्य न्याहाळताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 64 च्या नगरसेविका दिव्या गायकवाड मागील चार वर्षापासून यासाठी पाठपुरावा करत होत्या. आता प्रत्यक्षात सनसेट पॉईंट उभा राहिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.