दिवंगत कर्मचार्‍यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान

नवी मुंबई ः महापालिकेमार्फत सेवेची दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सेवेत असताना दुर्देवाने निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यानुसार दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून प्रदान करण्यात आले. 

महानगरपालिका 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर रुजू झालेल्या आणि नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सभासद असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे सेवेची दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सेवेत असताना दुर्देवाने निधन झाल्यास त्या अधिकारी, कर्मचारी यांनी नामानिर्देशित केलेल्या अथवा त्यांचे कायदेशीर वारस असलेल्या व्यक्तीस 10 लक्ष रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून प्रदान करण्यात येते.

यामध्ये स्मशानभूमी रक्षक असणारे 18 ऑगस्ट 2017 रोजी निधन झालेले भरत किसन तातळे यांच्या पत्नी सुगंधा भरत तातळे तसेच वाहनचालक आदेश अशोक चव्हाण यांच्या पत्नी ज्योती आदेश चव्हाण यांना प्रत्येकी 10 लक्ष रक्कमेचे धनादेश महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीहिताय भूमिकेतून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार, प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव यांनी सानुग्रह अनुदान रक्कमेचे धनादेश देण्याबाबतची कार्यालयीन प्रक्रीया पूर्ण केली.