बनावट पत्राद्वारे व्यापार्‍यांच्या फसवणुकीचा प्रयत्न

नवी मुंबई ः ‘भारतीय खाद्य संरक्षा व मानक प्राधिकरण’ या विभागाने अन्न व पर्यावरण संरक्षण संबंधित तपासणी करण्यासाठी आपली निवड केल्याचे बनावटपत्र दाखवून एपीएमसीतील मसाला मार्केटमधील व्यापार्‍यांकडून कारवाईच्या नावाखाली रोख रक्कम उकळण्याची घटना समोर आली आहे. दत्ताराम राठोड असे या भामट्याचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

दत्ताराम राठोड हा सोमवारी एपीएमसीतील मसाला मार्केटमध्ये गेला होता. यावेळी त्याने व्यापार्‍यांना आपण ‘भारतीय खाद्य संरक्षा व मानक प्राधिकरण’ या विभागाचा सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून या विभागाकडून अन्न व पर्यावरण संरक्षण संबंधित तपासणी करण्यासाठी आपली नेमणूक करण्यात आल्याचे बनावट पत्र दाखवले. तसेच, त्याच्या तपासणीत काही आढळून आल्यास त्याचा दंड म्हणून 1200 रुपये व त्याची फी 1200 रुपये अशी रक्कम द्यावी लागेल, अशी भीती दाखवली. या भामट्याने जे बनावट पत्र व्यापार्‍यांना दाखवले, त्या पत्रावर ‘भारतीय खाद्य संरक्षा व मानक प्राधिकरण’ या विभागाचे कार्यकारी संचालक शोबित जैन यांच्या सह्या असल्याचे लक्षात आल्याने काही व्यापार्‍यांनी या विभागाचे सहसंचालक संजीव पाटील यांच्याशी संपर्क साधून राठोड याच्या नियुक्तीबाबत विचारणा केली. त्यानुसार पाटील यांनी थेट दिल्ली येथील भारतीय खाद्य संरक्षा व मानक प्राधिकरण विभागाचे कार्यकारी संचालक शोबीत जैन यांच्याशी संपर्क केला. यावेळी जैन यांनी प्राधिकरणाकडून कुणालाच नियुक्त करण्यात आले नसल्याचे सांगितले. 

यावरून भामटा राठोड याने या विभागाचे बनावट पत्र तयार करून त्यावर कार्यकारी संचालकांची बनावट सही करून व्यापार्‍यांना कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयन केल्याचे आढळून आले. त्यामुळे प्राधिकरणाचे सहसंचालक संजीव पाटील यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार राठोड याच्या विरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक केकान यांनी दिली.