...तर ठिय्या आंदोलन

पनवेल ः कळंबोली वसाहतीमध्ये अंतर्गत गटारांची दुरावस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करुनही त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येथील रस्ता व गटारांची कामे पूर्ण न केल्यास सिडको कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा कळंबोली भाजपच्यावतीने घेण्यात आला आहे. 

या संदर्भात सिडकोला निवेदनही देण्यात आले आहे. त्या निवेदनात म्हंटले आहे कि, अंतर्गत रस्ते व गटारे नवीन करण्यासाठी वारंवार पत्र व्यवहार केला होता. तरीसुद्धा त्या रस्त्याचे पॅचवर्क कामाचे कार्यादेश काढण्यात आले आहे. वाहतूक व येणारा पावसाळा लक्षात घेता या ठिकाणी पॅचवर्क न होता त्या जागी नवीन रस्ते तसेच गटारे तयार करण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षांपासून से.14 व से.15 या दोन सेक्टरच्या रस्त्यावर दरवर्षी दीड ते दोन फूट पाणी साचून त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तेथे असणार्‍या वीजतारेमुळे पाण्यात वीज प्रवाह उतरतो. हि बाब सातत्याने निदर्शनास आणून देत असून तीन वर्षे पाठपुरावा करत आहोत पण या वर्षी आम्ही हे सहन करणार नाही. मे महिन्यापुर्वी काम पूर्ण झाले नाही तर सिडको ऑफीस मध्ये ठिय्या आंदोलन करू असे, या निवेदनात नमूद करून आंदोलनाचा इशारा सिडकोला दिला आहे.