विकासकामांसंदर्भात तातडीने कार्यवाही करणार

एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंदराज यांचे आश्‍वासन

पनवेल ः तालुक्यातील देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एन. एच. 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंदराज यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आज (दि. 11)  मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले.  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एन. एच. 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याच्या या कामांना मंजुरी मिळून बराच कालावधी होऊनसुद्धा अद्यापपर्यंत या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. त्यामुळे आ.प्रशांत ठाकूर यांनी पुनःश्च आग्रही मागणी करून लवकरात लवकर हि विकासकामे करा, असा आग्रह धरला. 

त्या अनुषंगाने या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल सिडको बांधणार आहे. तर विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होती मात्र या पुलाच्या खर्चात वाढ होणार असल्याने याचे काम एमएमआरडीए स्वतः करणार आहे. त्याचबरोबरीने  पनवेल एन. एच. 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला शासनाची मंजुरी मिळाल्या नंतर तातडीने काम हाती घेण्याचे आश्वासन डॉ. गोविंदराज यांनी दिले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.