जेष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणि यांना ‘अशोकपुष्प’

स्त्री शक्ती पुरस्कारांचे मोठया थाटात वितरण

नवी मुंबई ः सत्तर ते ऐंशीचा दशक आपला अभिनय, दिग्दर्शन, कथालेखन, निर्मिती व वितरण अश्या सगळ्या बाजु यशस्वी सांभाळून आपले वर्चस्व गाजवणार्‍या या कलावंताचा वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात अशोकपुष्प जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे व आर्शिवादामुळे माझे सर्वच चित्रपट गोल्डन ज्युबली ठरले यामुळे सर्वाचे धन्यवाद मानते. मला तुमचा सर्वांचे प्रेम मिळाले. मी स्वतःला खुप धन्य मानते की पुरस्कार मिळाला.

मराठी चित्रपटसृष्टी मध्ये सुषमा शिरोमणि हे नाव घेतले की भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी असे अनेक सिल्व्हर व गोल्डन ज्युबली झालेले चित्रपट डोळ्या समोर येतात. आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या या सुषमा शिरोमणिंना यंदाचा अशोकपुष्प जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जेष्ठ अभिनेते एस आर पाटील, आयोजक उमेश चौधरी, अनघा लाड, बाल कलांवत हितार्थ पाटील तसेच शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप जीवनगौरव सन्मान चिन्ह, पैठणी, रोख रक्कम अकरा हजार रुपये असे होते. अशोकपुष्प प्रकाशन आयोजित हा कार्यक्रम महिला दिनाचे औचित्य साधून गेली 5 वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येतो. यावेळी विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमठविणार्‍या डॉ.श्रुनाल जाधव, राजकीय क्षेत्रात आपले योगदान देणार्‍या ठाण्याच्या नगरसेविका रागीनी भास्कर बैरीशेट्टी, समाजसेविका राजश्री मुंडे, झी 24 तास या वृत्तनिवेदीका जयंती बामणे वाघधरे, फॅशन डिझाईनर दिपीका रावल, रोनकचे आर्थिक संचालीका गुरजीत कौर वीज, अभिनेत्री व मॉडेल अमरदिप कौर सयान, तसेच शैक्षणिक श्रेत्रात योगदान देणार्‍या अनुजा ठाकुर यांना स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड 2019 ची उपविजेती शिवाणी विश्वकर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली. लॉयन्स क्लबच्या तसेच समाजसेविका डॉ. नमिता मिश्रा, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मनोहर गायखे, गुड वन इंटरनेट प्रा.ली चे श्री कीर्ती कुमार, मास्टर एज्युकेयर चे नेम सिंग सिसोदिया, एस आर पी एन्टरटेन्टमेंट चे रवी चंडिकापुरे, समाजसेवक देवेंद्र खडसे व मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.