वाकयुद्धात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईकांची एकमेकांवर टिका

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.

एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार साहेबांची गणना देखील तुम्ही बाप बदलणार्‍या औलादींमध्ये करणार का? असा प्रतिप्रश्न गणेश नाईक यांनी केला आहे. त्या-त्या वेळेची गरज म्हणून पक्ष बदलले जातात, त्यामुळे अशी खालच्या स्थरावर टीका केली जाऊ नये, असंही गणेश नाईकांनी म्हटलं. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांचे जोरदार वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

माझा बाप काढला याचं मला दुःख नाही. कारण, माझा एकच बाप आहे. गणेश नाईक यांनी सतत बाप बदलले, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. गणेश नाईक यांनी 1990 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणार्‍याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे. जेव्हा गरीब आगरी समाजाची घरं पडत होती. त्यावेळी नाईक तुम्ही कुठं होता. ही घरं वाचवण्यासाठी सीमांकन का वाढवलं नाही?, स्वतःच बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. मग, गरीब आगरी समाजासाठी तुम्ही का लढले नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. ज्या समाजावर तुम्ही मोठं झालात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? जे तुम्हाला मिळालं ते माझ्या बापामुळेच. कारण, शरद पवार माझा बाप आहे, असंही आव्हाड सांगायला ते विसरले नाहीत. गणेश नाईक यांनी आजपर्यंत फक्त पैशाच्या जीवावर राजकारण केलं. मात्र, मी निष्ठेच्या जीवावर राजकारण करतो. त्यामुळे नवीमुंबईची लढाई ही गद्दार विरुद्द निष्ठावंत अशी होणार असल्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. 

तेरे बस की बात नहीं है

जितेंद्र आव्हाडांना टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अभिनेते नाना पाटेकर यांच्या विक्रम चहा या जाहिरातीचा दाखला देऊन पंजा लड़ाना तुम्हारे बस की बात नहीं अपने बाप को भेज, और नाम पूछा तो बोल गणेश नाईक.... असा जबरदस्त टोला हाणला आहे. नवी मुंबईचा गतिमान विकास साधला आहे. शर्यतीमध्ये विरोधक आमच्या आसपासही नाहीत त्यामुळे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही असे सांगून जे विरोधक नवी मुंबईच्या विकासावर प्रश्नचिन्ह उभे करतात त्यांनी आपापल्या शहरात विकासाबाबत काय दिवे लावले हे जनतेला ठाऊक आहे, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात झालेल्या टीकेचे सडेतोड उत्तर देताना हाथी चलता है अपनी चाल... असं म्हणत नाईक यांनी टीकाकारांना त्यांची जागा दाखवली. माझ्यावर अजून पर्यंत एकही साधा अदखलपात्र गुन्हा दाखल नाही. आणि विरोधक खंडणी घेतल्याचा आरोप करीत आहेत.