..तरीही गर्भवतींची ससेहोलपट सुरुच

बेलापूर आरोग्य केंद्रात सुविधा देण्याची मागणी

नवी मुंबई ः बेलापूर येथील  महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात चार महिन्यांपासून प्रसूती विभाग सुरू करण्यात आला आहे, मात्र अजूनही या विभागात अपुर्‍या सुविधा असल्याने येथे येणार्‍या गर्भवती स्त्रियांची ससेहोलपट सुरुच आहे. प्रसूतीसाठी येणार्‍या अनेक महिलांना नेरूळ किंवा वाशी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आरोग्य केंद्रातील प्रसूती विभागात पुरेशा सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.

बेलापूर येथे ग्रामपंचायत काळापासून आरोग्य केंद्र कार्यान्वित होते. प्रामुख्याने गर्भवती महिलांना चांगली सुविधा मिळत होती. पालिका अस्तित्वात आल्यानंतर या आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या वतीने सुविधा पुरवणे थांबवण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे हे आरोग्य केंद्र पडून होते. त्यानंतर महापालिकेने या ठिकाणी सुसज्ज असे आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि 5 वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची चार मजली इमारत उभारण्यात आली. या चार मजली इमारतीमध्ये वरचे मजले असेच पडून होते. खालच्या जागेत ओपीडी सुरू करण्यात आली. इतर किरकोळ तपासण्याही होत होत्या. या विभागात प्रसूती विभाग नसल्याने गरजू गर्भवती महिलांना नेरूळ, वाशी येथील रुग्णालये गाठावी लागत होती. नोव्हेंबर 2019पासून या ठिकाणी प्रसूती विभाग सुरू करण्यात आला. त्यामुळे परिसरातील महिलांना आधार मिळाला. येथे सुरुवातीला दिवसाआड आणि त्यानंतर किमान एक प्रसूती होत आहे. येथे सध्या तीन स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत, मात्र असे असले तरीदेखील काही गुंतागुंतीच्या वाटणार्‍या प्रसूतीसाठी महिलांना वाशी किंवा नेरूळ येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे इतके मोठे रुग्णालय सुरू होऊन अनेक महिलांना परत वाशी, नेरूळच्या रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळ येथे पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.