बाजारात आंब्याची आवक

नवी मुंबई ः पोषक वातावरणाच्या अभावामुळे यंदा कोकणचा हापुस लांबला असला तरी महाराष्ट्रातील अन्य भागांतून आणि शेजारील राज्यांतूनही आंब्याची आवक सुरु झाली आहे. आंब्याच्या आगमनाने व्यापार्‍यांसह खवय्येही सुखावले असून आंब्याची आवक अशीच वाढावी, अशी अपेक्षा होत आहे. 

फेब्रुवारी अखेरपर्यंत वाशीतील घाऊक बाजारात कोकणातून केवळ 50 ते 60 पेट्या हापूस आंब्याची आवक होत होती. मात्र आत्ता दोन दिवसांपासून कोकणासह राज्यातील अन्य भागांतून आणि शेजारील कर्नाटकमधूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे. अन्य भागांतून बाजारात तीन ते चार हजार पेट्यांची आवक होत आहे. त्यामुळे बाजारात आता आंबा दिसू लागला आहे.

वाशीतील घाऊक फळ बाजारातून देशाच्या कानाकोपर्‍यासह परदेशातही आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे दरवर्षी आंब्याचा व्यापार हा सर्व फळांपेक्षा सर्वाधिक होतो. परिणामी, सर्वाधिक आर्थिक उलाढालही याच काळात होते. त्यामुळे केवळ आंब्याचाच व्यापार करणारे व्यापारीही याच बाजारात आहेत, कारण वर्षभर जितका व्यापार होत नाही तितका व्यापार हा या हंगामात आंब्यामुळे होतो. त्यामुळे व्यापारी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत असतात.

यावर्षी मात्र आंब्याचा हंगाम लांबला असून त्याचे उत्पादनही कमी आहे. जानेवारी महिन्यात होणारी आवक मार्चमध्ये होत आहे. 2 मार्च रोजी महाराष्ट्रातील हापूस आंब्याची बाजारातील आवक 633 पेटी इतकी आहे. तर, महाराष्ट्रव्यतिरिक्त भागातून झालेली आवक दोन हजार 747 पेट्या इतकी आहे. 3 मार्च रोजी महाराष्ट्रातून म्हणजेच कोकणातून 510 हापूसच्या पेट्या आल्या आहेत. अन्य भागांतून झालेली आंब्याची आवक पाच हजार 312 पेट्या इतकी आहे. 4 मार्च रोजी कोकणातून केवळ 143 पेट्याच आल्या आहेत तर अन्य भागांतून चार 756 पेट्यांची आवक झाली आहे. 5 मार्च रोजी 770 पेट्या कोकणातून आल्या आहेत तर अन्य भागांतून तीन हजार 757 पेट्या आंबे बाजारात आले आहेत. सध्या हजार ते दोन हजार रुपये डझनपासून आंब्याच्या पेट्या बाजारात आहेत.