जगभरात जेएनपीटी 28 व्या क्रमांकावर

उरण : जेएनपीटीत पाच कंटेनर टर्मिनल्स असून जेएनपीटी देशातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लॉईड्सच्या अहवालानुसार जेएनपीटीचा जगभरातील पहिल्या 100 कंटेनर पोटर्सपैकी 28 वा क्रमांक असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.

इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत वाढत्या पायाभूत सुविधांमुळे जेएनपीटी बंदराचा कायापालट होत आहे. जेएनपीटीने सागरी उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी क्षमतावृद्धी करणारे व विविध सेवांमध्ये सुधारणा करणारे प्रकल्प सुरू केले आहेत. सध्या पोर्ट ऑफ सिंगापूर अ‍ॅथॉरिटी (पीएसए) च्या सहकार्याने चौथ्या टर्मिनल प्रकल्पाचे आठ हजार कोटींची गुंतवणूक करून काम सुरू केले आहे. यामध्ये 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याची क्षमता ही 2.4 दशलक्ष टीईयूची (24 लाख कंटेनर) असून त्याचे काम फेब्रुवारी 2018 पासून सुरू झाले आहे. 2022 पर्यंत बंदराच्या दुसर्‍या टप्प्यातील कामही पूर्णत्वास येणार आहे. त्या वेळी ही क्षमता वाढून 10 दशलक्ष टीईयू (एक कोटी कंटेनर) पर्यंत पोहोचेल. बंदरातील नेव्हिगेशनल चॅनेलच्या ड्रेजिंगचे काम पूर्ण झाले असल्यामुळे अत्याधुनिक (12,500 टीईयूज पर्यंतच्या) जहाजांना बंदरामध्ये आणता येणार आहे. जेएनपीटी-एसईझेडमध्ये फ्री ट्रेड वेअरहाउस झोन (एफटीडब्ल्यूझेड) विकसित करण्यात येत असल्याने व्यापाराबरोबरच साठवणूक आणि अन्य कामे करणे सोपे जाणार आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील जालना, वर्धा, नाशिक आणि सांगली येथेड्राय पोटर्सचा विकासही केला जात आहे.जेएनपीटीतर्फे एकूण कार्गो वाहतुकीपैकी 40 टक्के वाहतूक ही महाराष्ट्रातील कंटेनर्सची असते. म्हणूनच मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी हब आणि स्पोक तत्त्वावर महाराष्ट्रात ड्राय पोर्ट्सचा विकास करण्यात येत असून यामुळे कार्गो क्लीअरन्स आणि एकत्रीकरण करणे सोपे जाणार आहे.